CoronaVirus News: जोगेश्वरी, अंधेरीत सर्वाधिक रुग्ण, मृत्यू; धारावीलाही टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 06:40 IST2020-07-23T02:17:35+5:302020-07-23T06:40:06+5:30
झपाट्याने वाढतोय संसर्ग

CoronaVirus News: जोगेश्वरी, अंधेरीत सर्वाधिक रुग्ण, मृत्यू; धारावीलाही टाकले मागे
मुंबई : कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीत के पूर्व विभागाने मुंबईतील हॉट स्पॉट धारावीलाही मागे टाकले आहे. जोगेश्वरी, अंधेरी पूर्व परिसरात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढून आतापर्यंत ६,७८१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत सर्वाधिक ४३१ मृत्यू या विभागात झाले आहेत. अंधेरी येथे सेव्हन हिल्स रुग्णालय आणि जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये शहरातील अन्य भागांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे हा आकडा मोठा असल्याचा बचाव पालिका प्रशासन करीत आहे.
मुंबईतील आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक लाख तीन हजार २६२ वर पोहोचला आहे. यापैकी ७२ हजार ७९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वरळी, धारावी, भायखळा, वडाळा या शहर भागात रुग्णांचे प्रमाण अधिक होते. या हॉट स्पॉटमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान असल्याने पालिकेचे काम प्राधान्याने येथेच सुरू राहिले.
या काळात कोरोनाचा प्रसार पश्चिम उपनगरात वाढू लागला. अत्यावश्यक सेवेतील बहुतांशी कर्मचारी के पूर्व विभागात राहत असल्याने रुग्णांची संख्या वाढत गेली.
जोगेश्वरी, अंधेरी पूर्व या परिसराची लोकसंख्या सुमारे साडेआठ लाख एवढी आहे. मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ३ जूनपासून लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर के पूर्व विभागातील व्यावसायिक आणि औद्योगिक वसाहती, विमानतळ, मोठे हॉटेल्स, एमआयडीसीमधील व्यवहारही सुरू झाल्याने कोरोनाचा प्रसार वाढला. मात्र ‘मिशन झीरो’ मोहीम सुरू केल्यानंतर या विभागातील रुग्णसंख्या आता ७१ दिवसांनंतर दुप्पट होत आहे. १४ ते २१ जुलै या कालावधीत के पूर्व विभागात ४४६ रुग्णांंची नोंद झाली आहे.