दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 08:58 IST2025-07-23T08:57:57+5:302025-07-23T08:58:40+5:30

या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी सुरू होती. त्यात निर्दोष असल्याची माहिती मिळाली. हे ऐकून १९ वर्षांनी माझ्या कुटुंबाला पुन्हा भेटण्याची आस निर्माण झाली असं मोहम्मदने सांगितले. 

Job in Dubai, offer of Rs 10 lakh...; Mohammed Sheikh released after 19 years in Mumbai local serial blasts case | दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका

दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका

मुंबई - ११ जुलै २००६ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपी मुंबई हायकोर्टाने निर्दोष सोडले आहेत. सरकारी वकिलांना आरोपींविरोधात ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आले असं कोर्टाने म्हटले. कोर्टाच्या या निर्णयानंतर आरोपातून मुक्त झालेले मोहम्मद अली शेख गोवंडी येथील त्याच्या घरी पोहचला तेव्हा नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्याचे मिठाई भरवून स्वागत केले. १९ वर्षांनी कुटुंबासोबत एकत्रित आल्याचं मोहम्मद शेख म्हणाला.

मोहम्मद शेख म्हणाला की, मी इतक्या वर्षांनी माझ्या कुटुंबाला भेटलो आहे त्याचा आनंद शब्दात सांगू शकत नाही. १९ वर्षांनी मी पत्नी, मुले, भाऊ आणि बहिणींसोबत एकत्र आलोय. उच्च न्यायालयाने आम्हाला मुक्त केले आहे. सत्याचा विजय झाला आहे. गरज पडल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात आमचा खटला लढू आणि तिथेही आमचा विजय निश्चित आहे असं त्याने सांगितले. 

१० लाखांची होती ऑफर

आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवले होते. त्यात बऱ्याचदा टॉर्चर करण्यात आले. अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. या संपूर्ण चौकशीच्या काळात माझ्या ११ वर्षीय मुलालाही एटीएस अधिकाऱ्याने कानशि‍लात लगावली. माझ्या घरी अधिकारी यायचे आणि संपूर्ण कुटुंबाला त्रास द्यायचे. एका अधिकाऱ्याने माझ्या डोक्यावर बंदूक लावून सरकारी साक्षीदार बनण्यासाठी १० लाख रूपये आणि दुबईत नोकरीसह दरमहिना १० हजार देण्याची ऑफर दिली होती. इतके असूनही आम्ही खोटा गुन्हा कबूल केला नाही कारण आम्ही निर्दोष होतो असं मोहम्मद शेख याने म्हटले.

या प्रकरणाची ऑनलाईन सुनावणी सुरू होती. त्यात निर्दोष असल्याची माहिती मिळाली. हे ऐकून १९ वर्षांनी माझ्या कुटुंबाला पुन्हा भेटण्याची आस निर्माण झाली असं मोहम्मदने सांगितले. एहतेशाम सिद्दीकी आणि मला सोमवारी संध्याकाळी नागपूरच्या जेलमधून सोडण्यात आले. मंगळवारी सकाळी ३.३० वाजता आम्ही मुंबईसाठी रवाना झालो असं मोहम्मद शेख याने सांगितले. तर मुंबई स्फोटाचा तपास करताना शेख याच्या घरी पाकिस्तानी व्यक्ती आला होता. त्यानेच ११ जुलैला ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवला होता असं एटीएसने दावा केला होता. 
 

Web Title: Job in Dubai, offer of Rs 10 lakh...; Mohammed Sheikh released after 19 years in Mumbai local serial blasts case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.