JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 07:25 IST2025-11-16T07:24:40+5:302025-11-16T07:25:27+5:30
Mumbai JJ Hospital News: जेजे रुग्णालयाला वाढत्या कॅन्सर रुग्णांवर उपचारासह संशोधन करण्यासाठी इमारतीच्या शेजारीच असणारी ११ एकर जागेची मागणी केली.

JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: जेजे रुग्णालयाला वाढत्या कॅन्सर रुग्णांवर उपचारासह संशोधन करण्यासाठी इमारतीच्या शेजारीच असणारी ११ एकर जागेची मागणी केली. त्या संदर्भात ४ वर्षांत अनेकदा वैद्यकीय शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करूनही ती जागा मिळाली नाही. माफक दरात उपचार मिळावेत तसेच संशोधनासाठी या जागेची गरज असल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
जेजे रुग्णालयाशेजारील ही जमीन केंद्र सरकारच्या रिचर्डसन अँड क्रुडास अभियांत्रिकी कंपनीकडे होती. ही अभियांत्रिकी कंपनी आणि राज्य सरकारमधील ९९ वर्षांच्या लीजची मुदत संपल्यानंतर ही जागा आता मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. अलीकडेच मंत्रालयात जेजे रुग्णाशेजारील जमिनीच्या प्रस्तावाबाबतच्या व्यवहार्यतेवर बैठक घेण्यात आली होती. अधिकाऱ्यांना या जागेचा आकार जवळपास ३० एकर असल्याचे वाटत होते. त्या वेळी जे. जे. रुग्णालयाने या मोठ्या जागेच्या केवळ अर्ध्या भागाची मागणी केली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रत्यक्ष जागा केवळ ११ एकर असल्याचे स्पष्ट केले.
...म्हणून मोठ्या जागेची आवश्यकता
या प्रकरणी जे. जे. रुग्णालय व ग्रँट मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी या संदर्भात बैठक झाली होती. त्यावेळी आम्ही ही जागा कॅन्सर रुग्णाच्या उपचारासाठी आणि संशोधनासाठी द्यावी अशी मागणी केली. कारण कॅन्सरच्या सर्वसमावेशक उपचारासाठी मोठी जागा हवी. त्या ठिकाणी स्वतंत्र रुग्णालयदेखील गरजेचे आहे. सध्या रुग्णालयात १२५० खाटांचे नवीन सुपर-स्पेशालिटी विंग उभी राहात आहे. ती पुढील वर्षाच्या सुरुवातीला तयार होईल आणि त्यामुळे रुग्णालयातील खाटांची एकूण क्षमता २६०० होईल. अशावेळी कॅन्सर रुग्णालय आणि संशोधन केंद्रासाठी कॅम्पसमध्ये जागा उरणार नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
आम्ही ही जागा मिळावी म्हणून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अजून त्यावर अद्याप काही निर्णय झालेला नाही. मात्र, ही जागा मिळाली तर त्यावर कॅन्सर रुग्णाच्या उपचारासाठी त्यासोबत संशोधन करण्यासाठी स्वतंत्र इमारत उभारता येईल.- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री