Join us

"त्याला जीवे मारण्यासाठीच..."; सैफवरील हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:10 IST

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यावरुन शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केले आहेत,

Jitendra Awhad on Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री मुंबईत राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रात्री अडीचच्या सुमारास हा हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याची माहिती सैफ अली खानच्या टीमकडून देण्यात आली आहे. जीवघेणा हल्ला झाल्यानंतर मध्यरात्री ३.३० वाजता सैफला लिलावती रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शंका उपस्थित केली आहे. सैफला जीवे मारण्यासाठी हा हल्ला केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

सैफ अली खानच्या घरात चोर कसा घुसला हे कोणालाच समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मध्यरात्रीनंतर कोणीही त्यांच्या इमारतीत शिरले नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं आहे. आरोपी चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरी आले होते. मोलकरणीसोबत वाद होत असल्याचा आवाज ऐकून सैफला जाग आली. त्याने चोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने सैफवर धाकदार शस्त्राने सहावेळा वार केले. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आल्याची शंका उपस्थित केली आहे. 

"सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे. कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्‍या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे हे विशेष!," असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. 

मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं - शरद पवार

"मुंबईतील कायदा सुव्यस्था किती ढासळत आहे याचे हे लक्षण आहे. मध्यतरी त्याच भागात एकाची हत्या झाली आणि हा आता दुसरा प्रयत्न. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी गृहखाते त्यांच्याकडे आहे त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं," असं शरद पवार यांनी म्हटलं.

टॅग्स :सैफ अली खान जितेंद्र आव्हाडमुंबई पोलीसगुन्हेगारी