मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड हे आपल्या बिनधास्त स्वभावामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यातच, दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हाडं मोडण्याची भाषा केल्यानं त्यांचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं होतं. आता, शिवीगाळ करणं आणि वाट्टेल ते बोलणं हा माझा मूळ स्वभावच असल्याचं स्ष्टीकरण आव्हाड यांनी दिला आहे. आव्हाड यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत ठाण्यातील कार्यालयात रंगपंचमी साजरी केली. धुळवडीच्या निमित्ताने बोलताना त्यांनी शिवीगाळ याबाबतही स्पष्ट मत व्यक्त केलं.
मला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. परंतु, पाण्याचे वॉल्व्ह बंद करून जे महिलांना त्रास देत आहेत, ज्या व्यक्ती काही चुकीच्या गोष्टी करीत आहेत, त्यांची हाडे मी तोडून टाकणार, असे आव्हाड यांनी म्हटले होते. त्यानंतर, “माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की माझी दररोजच होळी असते. मी जे बोलतो, ते माझे कार्यकर्ते कधीच मनाला लावून घेत नाहीत. कारण, त्यांना माहितीये की हा रागाच्या भरात काहीही बोलतो. विशेष म्हणजे मी हे असं आज नाही, तर गेली 30-35 वर्षे बोलतोय. त्यामुळे शिवीगाळ करणं, वाट्टेल ते बोलणं हे माझ्या स्वभावात आहे. फक्त टीव्हीवर बोलता येत नाही”, असं आव्हाड यांनी म्हटलं.
कुणाचं आयुष्य बेरंग करू नये
जितेद्र आव्हाड यांनी ईडीकडून होत असलेल्या कारवायांबाबत आपलं मत मांडलं. 'कुणाचंतरी आयुष्य बेरंग करणं, याला देवही माफ करत नाही. प्रत्येकाचं आयुष्य सप्तरंगी असतं. ते आयुष्य बेरंग करून टाकायचं त्याच्या मुला-बाळांचं आयुष्य बेरंग करून टाकायचं. त्याच्या आयुष्यात काळजी यावी असं काहीतरी करायचं. काही दिवसांसाठी हे बरं वाटेल. आतमध्ये गेलेला माणूस कदाचित खंगून खंगून मरेल सुद्धा. पण, हे शाप आयुष्यभर तुमच्यामागे राहतील', असे म्हणत आव्हाड यांनी सध्याच्या कारवायांबाबत भाजप आणि केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.