Join us  

सुजय विखेंसाठी आव्हाडांचा इंग्रजीत निबंध; अण्णाभाऊ साठेंची करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 8:27 PM

आमदार निलेश लंकें यांना इंग्रजी बोलता येत नसल्याने खासदार सुजय विखे पाटील यांनी बोचरी टीका केली.

मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आजपर्यंत बडे नेते एमेकांवर तिखट शब्दात टीका करत होते. आता, लोकसभा मतदारसंघातील जाहीर उमेदवार एकमेकांवर बोचरी टीका करताना पाहायला मिळत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीच उमेदवार आणि भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी माजी आमदार व लोकसभा उमेदवार निलेश लंके यांनी खिल्ली उडवली. इंग्रजी भाषेत बोलता येत नसल्याचे सांगत विखेंनी निलेश लंकेंना चॅलेंजच दिले होते. त्यावरुन, आता राष्ट्रवादीने विखे पाटलांवर पलटावार केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विखे पाटलांना थेट अण्णाभाऊ साठेंची आठवण करुन दिली. 

आमदार निलेश लंकें यांना इंग्रजी बोलता येत नसल्याने खासदार सुजय विखे पाटील यांनी बोचरी टीका केली. सुजय विखेंच्या टीकेला स्वत: निलेश लंकेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. काबाडकष्टाने ताकद आणि पैशावर मात करता येते, असे इंग्रजीत वाक्य लिहून लंकेंनी सुजय विखे पाटलांना लक्ष्य केलं. तसेच, वैयक्तिक टीका टिपण्णी करण्यापेक्षा गेल्या ५ वर्षात मतदारसंघातील जनतेसाठी आपण काय केलं, हे सांगावं, असा सवालही लंकेंनी विखे पाटलांना विचारला. आता, लंकेंवरील टीकेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी इंग्रजी शब्दात समाचार घेतला आहे. आमदार आव्हाड यांनी इंग्रजीत छोटा निबंधच लिहिला असून अण्णाभाऊ साठे यांच्या महतीची सुजय विखेंना आठवण करुन दिली. 

सुजय विखेंकडून आम्ही खासदार शशी थरुर यांच्यासारख्या बोलण्याची अपेक्षा करतो, असे म्हणत आव्हाड यांनी खा. विखेंना टोला लगावला. तसेच, अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची आणि महतीची आठवणही करुन दिली. अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले होते, जे मागासवर्गीय समाजातून आणि महाराष्ट्राच्या एका लहानशा खेड्यातून मुंबईला आले होते. अण्णांनी अनेक पुस्तके आणि काव्यसंग्रह लिहिले, ज्यांचं जगभराने कौतुक केलं आहे, ते अण्णाभाऊ तुम्हाला आठवतात का, असे म्हणत सुजय विखेंना जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष्य केले. 

तुम्हाला केवळ सर्वसामान्य माणसांच्या भावना आणि मन समजायला हवं. तुम्ही जर तुमच्या गावातील लोकांसोबत इंग्रजीत संवाद साधला तर किती लोकांना तुमचं इंग्रजी समजेल?, असा सवालही आव्हाड यांनी केला. तसेच, केवळ गरीब पार्श्वभूमीतून निलेश लंके आले आहेत, म्हणून त्यांची खिल्ली उडवण्याचा अधिकार तुम्हाला नाही, अशा शब्दात त्यांनी सुजय विखेंवर जोरदार पलटवार केला आहे. 

काय म्हणाले होते सुजय विखे 

विखे पाटील यांनी प्रचाराच्या जाहीर सभेत निलेश लंकेंची खिल्ली उडवली. निलेश लंकेंनी माझ्याएवढे इंग्रजी बोलून दाखवावे, भलेही एक महिनाभर भोकमपट्टी करावी, पाठ करुन बोलून दाखवावे, पण इंग्रजीत बोलावे. त्यांनी इंग्रजीत बोलून दाखवल्यास मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो, असे चॅलेंजच सुजय विखेंनी लंकेंना दिले होते. त्यानंतर, लंकेनीही सुजय विखेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांना पैशाची मस्ती असल्याचे म्हटले आहे.  

टॅग्स :सुजय विखेजितेंद्र आव्हाडभाजपाइंग्रजीशशी थरूर