Jitendra Awhad Reporter Video: आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेनंतर विधानभवनाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. याचवेळी आमदार जितेंद्र आव्हाड विधानभवनात उभे होते, तिथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आले. त्यामुळे पत्रकारही तिथे आले. दोन्ही नेत्यांच्या भेटीचा व्हिडीओ पत्रकार शूट करत होते, तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी रागातच 'लोकमत'च्या रिपोर्टरच्या हातावर मारला. जितेंद्र आव्हाडांच्या या कृतीवर टीका होत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. गुरूवारी (१७ जुलै) घडलेल्या या घटनेनं विधानभवनात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
आव्हाडांनी पत्रकाराच्या मारले हातावर
जितेंद्र आव्हाड विधानभवनाच्या बाहेर उभे होते. तिथे पत्रकार आणि कार्यकर्तेही त्यांच्या आजूबाजूला हजर होते. त्याचवेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तिथे आले.
जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे यांच्यात संवाद झाला. यावेळी जितेंद्र आव्हाड अंबादास दानवेंच्या कानात बोलले. त्यानंतर ते पत्रकारांना म्हणाले शूट करू नका. त्यानंतर रागातच त्यांनी मोबाईलने शूट करत असलेल्या पत्रकाराच्या हातावर जोरात चापट मारली.
जितेंद्र आव्हाडांचा व्हिडीओ बघा
आव्हाडांनी चौथ्या स्तंभावर हल्ला केला -राणे
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. ते म्हणाले, "लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्ला केला. विधानभवनासारख्या पवित्र स्थळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट पत्रकाराला मारहाण केली. त्याला वार्तांकन करण्यापासून रोखलं. हा केवळ पत्रकारिता नाही, तर लोकशाहीचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न आहे", असे नितेश राणे म्हणाले.
आमचा तो बाब्या तुमचं ते कार्ट, भाजपची टीका
जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारावरच हात उचलल्याचे म्हणत सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून टीका होत आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीबद्दल म्हटलं आहे की, "आमचा तो बाब्या तुमचं ते कार्ट. काल विधीमंडळात पुरोगामी शिरोमणी जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकाराला मारहाण केली. आता समस्त पुरोगामी, संपादक व पत्रकार संघटना कोणती भूमिका घेणार?", असे केशव उपाध्ये म्हणाले.
"कल्पना करा कुणी संघ भाजपा परिवारातील व्यक्तीकडून चुकून एखादा चुकीची शब्द बाहेर पडला तरी ही मंडळी समस्त पत्रकारिता धोक्यात आल्याच सांगत रस्त्यावर येतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याची भाषण ठोकतात. मग आता इथे आव्हाड सणसणीत पत्रकारांच्या कानाखाली मारतोय. मग आता मंडळी गप्प का?" असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.
"यावेळी पण दुजाभाव दाखवणार का? अर्णव गोस्वामीला थेट घरातून उचलले पण सर्व पुरोगामी गप्प… कारण काँग्रेस उद्धव ठाकरे सरकार होते. अजून राहुल कुलकर्णींसह अनेक उदाहणे देता येतील, पुरोगाम्यांना गैरसोयीच असेल तर चिडीचुप्प सगळे… इथे विधानभवनात मारहाण करतात…पण तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते गप्प राहणार का?", अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.