Join us

आमदार जितेंद्र आव्हाडांनी फोडलं पाकिस्तानी साखरेचं गोदाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 13:50 IST

पाकिस्तानमधून आयात करण्यात आलेल्या साखरेविरोधात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

दहिसर - पाकिस्तानमधून आयात करण्यात आलेल्या साखरेविरोधात सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दहिसरमधील पाकिस्तानी साखरेचं गोदाम फोडले आहे. दहिसर गावात ही साखर साठवण्यात आली होती. 

‘पाकिस्तानची साखर शेतक-यांना उद्ध्वस्त करणारी’भारतीयांना उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानचा माल आयात करण्याचे नवे धोरण भाजपा सरकारने आखले आहे. ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. ऊस उत्पादक शेतकरी हमीभावासाठी आक्रोश करत असताना, पाकिस्तानातील साखर येथे आणून आमच्या शेतक-यांना उद्ध्वस्त केले जात आहे. पाकिस्तानची ही साखर आमच्या देशात विकू देणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी दिला होता.

राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे. ही साखर येथील बाजारभावापेक्षा एक रुपयाने कमी किमतीची आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा आमदार आव्हाड यांनी दिलेल्या पत्रकात समाचार घेतला होता व सोमवारी (14 मे) दहिसरमधील पाकिस्तानी साखरेचं गोदाम फोडले.

(फोटो-विशाल हळदे)

नेमके काय आहे प्रकरण ?ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फायदा उठवित मुंबईतील एका बड्या उद्योग समुहाने ३० हजार क्विंटल साखरेची आयात केली आहे.विशेष म्हणजे पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा एक रुपयांनी कमी आहेत. कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. पनवेल आणि वाशी येथील गोदामामध्ये ती ठेवण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसपाकिस्तान