जिया खानची आत्महत्या; २८ एप्रिलला निकाल, अभिनेता सूरज पांचोलीचे भवितव्य टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 14:00 IST2023-04-22T13:59:55+5:302023-04-22T14:00:18+5:30
Jiah Khan's suicide Case; बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याचा निकाल २८ एप्रिलला देणार असल्याचे विशेष सीबीआय न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

जिया खानची आत्महत्या; २८ एप्रिलला निकाल, अभिनेता सूरज पांचोलीचे भवितव्य टांगणीला
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या खटल्याचा निकाल २८ एप्रिलला देणार असल्याचे विशेष सीबीआय न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जिया खानला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीवर आहे. त्यामुळे २८ एप्रिलच्या निकालावर पांचोलीचे भवितव्य अवलंबून आहे. या खटल्यातील युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाले.
'निःशब्द' या चित्रपटातून लोकांच्या पसंतीस उतरलेल्या जिया खानने ३ जून २०१३ रोजी जुहू येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. १० जून रोजी पोलिसांच्या हाती जियाने लिहिलेली सुसाइड नोट लागली. त्यावरून पोलिसांनी तिचा प्रियकर सूरजला अटक केली. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे त्या चिठ्ठीद्वारे उघडकीस आले. मात्र, जिया खानची आई राबिया हिने जियाची हत्या करण्यात आल्याचा दावा करत तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.