सायन येथील कंपनीतून २९ लाखांच्या दागिन्यांचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:35 IST2025-10-09T10:35:22+5:302025-10-09T10:35:32+5:30
ऑडिटमध्ये दागिने गायब असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांची चाकैशी सुरू आहे.

सायन येथील कंपनीतून २९ लाखांच्या दागिन्यांचा अपहार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायन ट्रॉम्बे रोडवरील एका ज्वेल्स लिमिटेड कंपनीतून २९ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोने व हिऱ्याचे दागिने गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीच्या स्टोअरमध्ये नियमित ऑडिट दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. कर्मचाऱ्यांनी दागिने अपहार केल्याचा संशय कंपनी प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यानुसार, चुनाभट्टी पोलिस तपास करत आहेत.
कंपनीचे सीनिअर मॅनेजर लॉजिस्टिक्स संजीव सभापती तिवारी (४८) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ज्वेल्स लिमिटेड हे संपूर्ण भारतात कार्यरत आहे.
देशभरातून सोन्याचे, चांदीचे व हिऱ्याचे दागिने येथे पाठवले जातात. नंतर शोरूमच्या मागणीनुसार वितरित केले जातात. मे २०२५ मध्ये प्राथमिक ऑडिट दरम्यान काही दागिने साठ्यातून गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये अधिक सखोल ऑडिट करण्यात आले. यावेळी एकूण ३१४ ग्रॅम वजनाचे ३२ नग दागिने गायब असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.
चोरी कशी झाली?
दागिने विविध प्रक्रियांसाठी स्टाफकडे दिले होते, मात्र ते वॉल्टमध्ये परत न झाल्याचे आढळून आले. कंपनीत जवळपास ६० कर्मचारी, २० सुरक्षा रक्षक, अन्य ३० कर्मचारी व १० हाउसकीपिंग कर्मचारी कार्यरत आहेत.
दागिन्यांच्या अपहाराच्या शक्यतेमुळे कंपनी प्रशासनाने अंतर्गत चौकशी सुरू केली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलिसांत तक्रार दिली आहे.