मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:07 IST2025-11-25T10:07:22+5:302025-11-25T10:07:41+5:30
Mumbai Fraud News: प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा वंशज असल्याचे आणि आपल्याकडे ‘पैगंबरांचा केस’ असल्याची थाप मारून एका भामट्याने माहीममधील कुटुंबाची १० लाखांची फसवणूक केली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
मुंबई - प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा वंशज असल्याचे आणि आपल्याकडे ‘पैगंबरांचा केस’ असल्याची थाप मारून एका भामट्याने माहीममधील कुटुंबाची १० लाखांची फसवणूक केली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.
मोहसिन अली अब्दुल सत्तार कादरी (३१) या भामट्याने आपल्याकडे ‘पैगंबरांचा केस’ असल्याचा दावा करून अन्सार अहमद अब्दुल गनी फारुकी (३१) याला भरभराटीचे आमिष दाखवले आणि त्याबदल्यात १० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून घेतले, असे पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी कादरी २०१२ पासून अन्सार फारुकीच्या भावाच्या संपर्कात होता. ईद मिलादुन्नबी कार्यक्रमासाठी सप्टेंबर २०२२ मध्ये फारुकी कुटुंबाने कादरीला घरी बोलावले. त्यावेळी त्याने काचेच्या डबीत ‘पैगंबरांचा केस’ असल्याचा दावा केला आणि ती डबी कपाटात ठेवून प्रार्थना केली. त्यानंतर, कादरीने, “सोन्याचे दागिने पैगंबरांच्या केसाच्या डबीजवळ ठेवल्यास भरभराट होईल,” असे फारुकी कुटुंबातील महिलांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलांनी दागिने आरोपीकडे दिले. त्याने ते कपाटात पैगंबरांच्या कथित केसाच्या डबीजवळ ठेवले.
पैगंबराचा कथित केस तेथेच, दागिने मात्र गायब
मागणी करूनही आरोपीने दागिने परत न केल्याने फारुकी कुटुंबाला संशय आला. त्यांनी कपाट उघडल्यावर काचेच्या डब्यातील केस तर दिसला; पण सोन्याचे दागिने मात्र गायब होते. आरोपीला विचारल्यावर त्याने आर्थिक अडचणीमुळे दागिने गहाण ठेवल्याचे सांगितले, परंतु तीन वर्षांत त्याने दागिने परत केले नाहीत. अखेर फारुकी यांनी माहीम पोलिसात धाव घेतली.