Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवणारा जेरबंद, आपल्याच मुख्याध्यापकाच्या मुलालाही घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 08:42 IST

त्याला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मुंबई : मंत्रालयात कंत्राटी लिपीक, डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई या पदांवर नोकरी लावण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना बनावट नियुक्ती पत्र देणाऱ्याला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दीपेश भोईर (३३) असे त्याचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मुख्याध्यापकाच्या मुलालाही गंडविले असून, त्याच्याकडून १५ नियुक्ती पत्रे जप्त करण्यात आली आहेत. भोईरला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भार्गव भालेकर यांचे वडील मुख्याध्यापक असलेल्या पालघर जिल्ह्यातील शाळेत भोईर शिक्षण घेत होता. तो जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला असून, नुकतीच त्याची मंत्रालयात बदली झाली आहे. मंत्रालयात चार ते पाच मुले कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता पाहिजे असल्याचे त्याने सांगितले होते. भालेकर यांनी मुलासाठी विचारणा केली. नोकरीस लावून देणाऱ्या अधिकाऱ्यांना पार्टी देण्याच्या नावाने भोईरने भालेकर यांच्याकडून तीन हजार रुपये घेतले.  

त्यांच्या मुलाला कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाचे नियुक्ती पत्र दिले. तसेच ओळखपत्र बनविण्यासाठी आणखीन ५०० रुपये घेऊन ओळखपत्र बनवून दिले.  तरुणाने नोकरीसाठी मंत्रालयात धाव घेतल्यानंतर ते बनावट असल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने १५ फेब्रुवारी रोजी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. अटक होऊ नये म्हणून भोईर हा सतत राहण्याची जागा बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर, बुधवारी मानपाडा येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

१५ लोकांचे नियुक्ती पत्र अन् बरंच काही...झडतीदरम्यान त्याच्या ताब्यातून महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबईचे डॉ. दीपेश भोईर या नावाचे सहा. प्रशासन अधिकारी (अति.) या पदनामाचे ओळखपत्र आणि मंत्रालयातील कंत्राटी लिपिक, कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर व कंत्राटी शिपाई या पदाचे एकूण १५ लोकांचे नियुक्ती पत्र आढळले. 

जिल्हा परिषदेत नोकरी आणि निलंबित...भोईर हा जिल्हा परिषद पालघर येथे अनुकंपावर नोकरीस लागला होता.  २०१८ च्या सुमारास त्याच्यावर अपहार केल्याच्या आरोपावरून, तारापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल झाल्याने त्याला निलंबित करण्यात आले होते. नोकरी गेल्याने कोरोनाच्या लॉकडाउननंतर त्याने लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली.

टॅग्स :मंत्रालयगुन्हेगारीमुंबई