जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातून आर्यन प्रकाश, निलकृष्ण गजरे, दक्षेश मिश्रा यांना १०० टक्के
By रेश्मा शिवडेकर | Updated: February 13, 2024 12:01 IST2024-02-13T11:48:14+5:302024-02-13T12:01:10+5:30
एनटीएने jeemain.nta.ac.in वर जेईई मुख्य निकाल, २०२४ डाउनलोड करण्यासाठी लिंक अपडेट केली आहे

जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातून आर्यन प्रकाश, निलकृष्ण गजरे, दक्षेश मिश्रा यांना १०० टक्के
मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) आयआयटीसारख्या केंद्रीय शिक्षणसंस्थामधील प्रवेशासाठी ग्राह्य धरल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (जेईई) निकाल जाहीर करण्यात आला आहे. आर्यन प्रकाश, निलकृष्ण गजरे, दक्षेश मिश्रा या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाईल मिळाले आहेत. देशभरात १०० पर्सेटाईल मिळविणाऱ्या २३ विदयार्थ्यांमध्ये यांचा समावेश आहे. देशभरात ११ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात ३ लाख ८१ हजार मुली आहेत. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या निवडक दीड लाख विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यावरील जेईई ऍडव्हान्स ही परीक्षा द्यावी लागते.
एनटीएने jeemain.nta.ac.in वर जेईई मुख्य निकाल, २०२४ डाउनलोड करण्यासाठी लिंक अपडेट केली आहे. गुणपत्रिका डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना जेईई मेन, २०२४ च्या अधिकृत वेबसाइटवर जेईई मुख्य निकालाचे लॉगिन तपशील द्यावे लागतील. बीई, बीटेकची उत्तरतालिका (पेपर १) jeemain.nta.ac.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पेपर २ ची अंतिम उत्तरतालिका लवकरच ऑनलाइन अपडेट केली जाईल. निकालाच्या पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्तपासणीकरीता अर्ज करता येणार नाही. जेईई मेनच्या निकालात मिळवलेले गुण अंतिम मानले जातील. एकूण २३ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत. त्यापैकी सर्वाधिक टॉपर्स तेलंगणातील आहेत.