Join us
Daily Top 2Weekly Top 5

Jayant Patil : कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 20:06 IST

Jayant Patil : जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली होती. राज्याची मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती

ठळक मुद्देपाटील यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मी ठणठणीत असल्याचं म्हटलं. तसेच, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो

मुंबई -  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. राज्याची मंत्रिमंडळ बैठक सुरू असताना अस्वस्थ वाटू लागल्यानं जयंत पाटील बैठक अर्धवट सोडून रुग्णालयामध्ये रवाना झाले. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं. पण रुटीन चेकअपसाठी जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात आल्याची माहिती समोर आली आहे. आता, स्वत: जयंत पाटील यांनी ट्विट करुन यांसदर्भात माहिती दिली आहे.  

जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली होती. राज्याची मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगादेखील होता. दरम्यान, जयंत पाटील त्यांच्या रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचीही चर्चा होती. तर, दुसरीकडे अफवाही पसरल्या जात होत्या. मात्र, आता जयंत पाटील यानीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

पाटील यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मी ठणठणीत असल्याचं म्हटलं. तसेच, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 

टॅग्स :जयंत पाटीलहॉस्पिटलराष्ट्रवादी काँग्रेस