Join us

"चंद्रावर जायला ६०० कोटी अन् अलिबाग ते विरारला २६ हजार कोटी"; जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:29 IST

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी महायुती सरकारच्या टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला.

Jayant Patil : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरु झालीय. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात  महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यातून मविआने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकलं आहे. या मेळाव्यासाठी मविआतील पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी असे काही विधान केलं की सभागृहात एकच हशा पिकला. जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या  टेंडर पद्धतीबाबत केलेल्या टिप्पणीमुळे पदाधिकाऱ्यांबरोबरच व्यासपीठावरील नेत्यांनाही हसू अनावर झालं.

 महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना टेंडर प्रक्रियेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. महायुती सरकारमध्ये विकासकामांसाठी राबवल्या जाणाऱ्या टेंडर प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रावर जायला ६०० कोटी लागतात पण अलीबाग ते विरार वसईला जायला २६ हजार कोटी खर्च येत असल्याचा टोला सरकारला लगावला. अलिबाग-विरार कॉरिडोअर प्रकल्पावर भाष्य करताना विरारपेक्षा चंद्रावर जाणं स्वस्त असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

१३ ऑगस्टला महाराष्ट्र मंत्रिमंडळानं एक निर्णय घेतला ज्यामध्ये ६ हजार किलोमीटरचे रस्ते बांधायला मंजुरी दिली. कोणतं महामंडळ रस्ते बांधणार आहे? तर महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. मी आरोप केला होता की विधानभवनाच्या इमारतीसमोर एका इमारतीत या महामंडळाचं कार्यालय आहे. तिथे एक अधिकारी आणि त्याचे दोन-तीन पीए आहेत. त्याशिवाय त्याच्याकडे दुसरं कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर नाही. पण त्या महामंडळाकडे ३७ हजार कोटींचे रस्ते बांधण्याची जबाबदारी दिली आहे. फक्त टक्केवारी घेऊन काम देणं हा उद्योग करणारं हे महामंडळ आहे", असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

"लोकसभा निवडणुकीआधी या सरकारने ९० हजार कोटींच्या रस्त्यांचे टेंडर काढले. जालन्यातून नांदेडला जाणारा रस्ता. ११ हजार कोटींचा अंदाजित खर्च आहे. पण टेंडर जातंय १५ हजार कोटींना. एका किलोमीटरला खर्च येतोय ८३ कोटी," असेही जयंत पाटील म्हणाले.

अलिबागहून वसई-विरारला पोहोचायला ९६ किलोमीटरचं कॉरिडोअर बांधणार आहेत. त्यासाठी २० हजार कोटींचा खर्च आहे. २६ हजार कोटींना टेंडर चालू आहे. एका किलोमीटरचा खर्च २७३ कोटी रुपये असेल. ३ लाख ८५ हजार किलोमीटवर चंद्र आहे. नाना पटोलेंना माहिती असेल चंद्र कुठे आहे. तिथे आपलं चांद्रयान फक्त ६०० कोटींमध्ये गेलं. पण अलिबागहून वसई-विरारला जायला जो रस्ता होणार आहे, त्यावरून फक्त ३ किलोमीटर जरी गेलात तरी ६०० कोटी संपतील,” असं जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :जयंत पाटीलएकनाथ शिंदेवसई विरारअलिबाग