एक थीम, दोन दिवस अन् असंख्य आठवणी; जय हिंदच्या 'डेटूर' महोत्सवात क्रिएटिव्हिटीचा जागर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:36 IST2026-01-25T14:36:15+5:302026-01-25T14:36:52+5:30
'जय हिंद कॉलेज'चा मास मीडिया विभागाचा वार्षिक महोत्सव 'डेटूर' पुन्हा एकदा संस्मरणीय ठरला आहे.

एक थीम, दोन दिवस अन् असंख्य आठवणी; जय हिंदच्या 'डेटूर' महोत्सवात क्रिएटिव्हिटीचा जागर
'जय हिंद कॉलेज'चा मास मीडिया विभागाचा वार्षिक महोत्सव 'डेटूर' पुन्हा एकदा संस्मरणीय ठरला आहे. यंदा हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात आणि कल्पक दृष्टीकोनासह पार पडला. यावर्षीची “द विंगमॅन शो” ही आगळीवेगळी थीम विशेष लक्षवेधी ठरली, ज्यामध्ये मुख्य पात्रांऐवजी कथेला आकार देणाऱ्या 'साईडकिड्स'च्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला होता. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात शहरभरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत क्रिएटिव्हिटी, स्पर्धा आणि सहकार्याचा उत्सव साजरा केला.
२० जानेवारी रोजी प्रचंड उत्साहात महोत्सवाला सुरुवात झाली. मुंबईतील २० हून अधिक महाविद्यालयांच्या संघांनी कॅम्पसमध्ये गर्दी केली होती. 'लिप सिंक बॅटल' आणि 'स्ट्रीट डान्स' यांसारख्या स्पर्धांनी वातावरणात जोश भरला, तर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या 'एस्केप रूम'ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्या दिवसाचं मुख्य आकर्षण ठरलेल्या 'फॅशन शो'चे परीक्षण श्रेया गुलाटी, व्हॅलेना आणि तानिया गुप्ता यांनी केलं. यात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि नाविन्यपूर्ण शैलीचे दर्शन घडवलं.
दिलखुलास गप्पा आणि आठवणी
पहिल्या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीचा सहभाग असलेला प्रमोशनल पॅनेल शो. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या ३० वर्षांच्या प्रवासाचे निमित्त साधून 'रोटॉक्स' सोबत तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिलखुलास गप्पा आणि आठवणींनी वातावरण भारावून गेलं होतं. तसेच यावर्षी पहिल्यांदाच 'जॅम' स्पर्धा मीडिया क्षेत्राव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांसाठीही खुली करण्यात आली होती. हॉर्मुझ रगीना यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं.
बँड, डीजे इव्हेंट्सनी संध्याकाळ रंगतदार
दुसऱ्या दिवशी सादरीकरण आणि कथाकथनावर भर देण्यात आला. डान्स आणि ड्रामा यांसारख्या मुख्य स्पर्धांना प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. शॉर्ट फिल्म स्क्रिनिंगमधून विविध विचार आणि आवाज ऐकायला मिळाले, तर बँड आणि डीजे इव्हेंट्सनी संध्याकाळ अधिक रंगतदार बनवली. 'जनरल इव्हेंट्स'मध्ये 'मॉक कोर्टरूम'मधील खडाजंगी, कॅरिकॅचर स्पर्धा, रॅप बॅटल आणि क्विझ अशा वैविध्यपूर्ण स्पर्धा पार पडल्या.
विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता
राहुल ढोलकिया, रिमा माया, हरमन सिंघा, ऋषभ वाला, आयेशा खान, विवान शाह, देविका वत्स, आसा सिंग आणि प्रतीक्षा श्रीवास्तव यांसारख्या दिग्गज परीक्षकांच्या उपस्थितीने महोत्सवाची उंची वाढली. 'भय: द गौरव तिवारी मिस्ट्री' या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी करण टॅकर, अर्शद सय्यद, सलोनी बात्रा आणि दिग्दर्शक रॉबी ग्रेवाल यांनी हजेरी लावली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली.
पारितोषिक वितरण समारंभ
महोत्सवाचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला. दोन दिवसांच्या आठवणींचा 'आफ्टरमूव्ही' पाहून अनेक विद्यार्थी भावूक झाले. ऑनलाईन बोनस, जनरल आणि फ्लॅगशिप इव्हेंट्ससह 'डॅम' मधील विजेत्यांना गौरविण्यात आलं. 'डेटूर' केवळ एक स्पर्धा म्हणून नव्हे, तर विचार, गोष्ट आणि माणसं यांना जोडणारं एक व्यासपीठ म्हणून यशस्वी ठरलं. या महोत्सवाने महाविद्यालयीन विश्वातील आपलं मानाचे स्थान पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.