राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून, मुंबईतील शाळांबाबतही झाला मोठा निर्णय
By बाळकृष्ण परब | Updated: January 15, 2021 20:10 IST2021-01-15T20:00:28+5:302021-01-15T20:10:36+5:30
School News : राज्यातील इतर भागात नववी, दहावी बारावीपाठोपाठ पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू होणार असले तरी मुंबईतील शाळा मात्र बंदच राहणार आहेत.

राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून, मुंबईतील शाळांबाबतही झाला मोठा निर्णय
मुंबई - गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील शाळांचे पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू होत आहेत. तत्पूर्वी राज्यातील नववी, दहावी, बारावीचे वर्ग आधीपासूनच सुरू झालेले आहेत. मात्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतीलशाळांची घंटा अद्याप वाजलेली नाही. दरम्यान, आता राज्यातील इतर भागात नववी, दहावी बारावीपाठोपाठ पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू होणार असले तरी मुंबईतील शाळा मात्र बंदच राहणार आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा १६ जानेवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या शाळा १६ जानेवारीपासून पुढील निर्देश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने दिली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रकोप कमी झाला असला तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे मुंबई मधील शाळा नाराज असून कमीतकमी ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करायला हवे होते. कारण मुंबई मधील मुलांचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर सतत होत आहेत. बोर्ड परीक्षेचा अभ्यास तसेच पूर्वतयारीसाठी फक्त तीन महिने मिळणार आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम कधी पूर्ण होणार. तसेच महापालिकेच्या वतीने आजतागायत कोणताही कोविडबाबत आदेश होऊनही शाळांना साहित्यांची मदत नाही, ती त्वरित करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रमेश रेडीज यांनी दिली आहे.