मुंबई : मुंबईसह राज्याचा पारा दिवसागणिक वाढतच आहे. राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४० अंशा पार गेले आहे. परिणामी नागरिकांची ऊन्हाळे होरपळ होत आहे. आणि वाढत्या ऊन्हाचा फटका पक्षी, प्राण्यांनादेखील बसू लागला आहे. मुंबईतल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील पक्ष्यांसह प्राण्यांचीदेखील वाढत्या ऊन्हाने होरपळ होत असून, त्यांना दिलासा देण्यासाठी येथे पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याच प्राण्यांपैकी एक असलेला येथील शक्ती नावाचा वाघ आपल्या पिंज-यातील छोटयाशा तलावात मनसोक्त जलविहार करत असून, वाढत्या तापमानापासून स्वतचा बचाव करत आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे प्राणी व पक्ष्यासांठी पारंपारिक पद्धतीचे पिंजरे न उभारता, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाशी नाते सांगणारी दालने उभारण्यात आली आहेत. पूर्वीच्या पिंज-यांना असायचे तसे गज वापरण्याऐवजी दालनांच्या दर्शनी भागात उत्कृष्ट दर्जाची व वैशिष्ट्यपूर्ण प्रकारची मजबूत काच बसविण्यात आल्या आहेत. ज्यामुळे प्राण्यांना विना अडथळा बघणे व त्यांचे अधिक चांगले छायाचित्रण करणे शक्य होत आहे. मुक्त पक्षी विहारासह बिबट्यांच्या दालनाच्या सभोवताली जर्मनीहून आयात केलेली गंजरोधक व मजबूत जाळी बसविण्यात आली आहे. तसेच या जाळींमुळे दालनांच्या सौंदर्यला व कलात्मकतेला बाधा येणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.
मुक्त पक्षी विहारात विविध प्रजातींचे १०० पक्षी असून याची कमाल क्षमता २०० पक्ष्यांची आहे. याच ठिकाणी पक्ष्यांना अनुरुप ठरतील अशी विविध प्रजातींची झाडेही आहेत. अशातच आता घाम फोडणारा ऊन्हाळा सुरु झाला आहे. परिणामी येथील पक्षी प्राण्यांना ऊन्हाचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पुरेशी काळाजी घेण्यात आली असून, अधिकाधिक पाण्याची व्यवस्था करण्यात आली. शक्ती नावाच्या वाघाच्या पिंज-यातील छोटयाशा तलावात भरपूर पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, हा वाघ सध्या वाढत्या ऊन्हापासून बचाव करण्यासाठी येथे मनसोक्त जलविहार करत आहे.