Join us  

'जय भवानी' फक्त घोषणेपुरती?; बाळासाहेबांच्या 'त्या' स्वप्नाशीही शिवसेनेनं केली 'तडजोड'!

By महेश गलांडे | Published: October 09, 2019 11:28 AM

बाळासाहेबांनी आपला उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्रं सोपवली होती.

महेश गलांडे

जन्मापासूनच आक्रमक, निर्णयावर ठाम, धाडसी निर्णय, 'अरे'ला कारे आणि तडजोड मान्य नसलेल्या सैनिकांची सेना म्हणजे शिवसेना. म्हणूनच शिवसेना ही अल्पावधीतच ग्रामीण भागात रुजली, गावकडच्या युवकांनी बाळासाहेबांना दैवत मानून शिवसेनेसाठी काम केलं. म्हणून गावा-खेड्यात शिवसेना वाढत गेली. बाळासाहेब हाच विचार, शिवसेना हाच विचार मानून शिवसैनिकांनी एकनिष्ठेचं उदाहरण इतर पक्षांपुढे ठेवलं. दिसला बाण की मार शिक्का असं घोषवाक्यच 1995 ते 2004 या कालावधीपर्यंत राज्यात दिसत होतं. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना बदलत गेली.

बाळासाहेबांनी आपला उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्रं सोपवली होती. उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं होतं. त्यानुसार सगळे 'मावळे' उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. पण, ज्यांच्यावर 'मोडेन पण वाकणार नाही', असे संस्कार झालेत त्यांना सध्या सुरू असलेली 'तडजोड' फारशी रुचत नाही, पटत नाही. बाळासाहेबांचं श्रद्धास्थान आणि ऊर्जास्थान असलेला मतदारसंघ उद्धव ठाकरेंनी यंदा भाजपाच्या पारड्यात टाकला हेही तुळजापूरच्या सैनिकांना खटकलंय. 

बाळासाहेबांचं तुळजापूरशी नातं

बाळासाहेबांच्या भाषणात तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं स्थान होतं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, जाणता राजा शिवछत्रपती हे आराध्य दैवत मानून, समोर जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो हे शब्द कानावर पडताच उपस्थित जनसागर उसळलेला पाहायला मिळायचा. सेना-भाजपच्या 25 वर्षांच्या युतीत बाळासाहेबांनी नेहमीच तुळजापूर हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला. विशेष म्हणजे एकदाही शिवसेनेला तुळजापूर मतदारसंघात विजय मिळाला नाही, पण बाळासाहेबांनी तुळजापूर या मतदारसंघाशी कधीही तडजोड केली नाही. विधानसभा निवडणुकांच्या काळात या मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारानिमित्त बाळासाहेब तुळजापूरला सभा घ्यायचे, त्यावेळी भवानीमातेच्या दर्शनालाही जायचे. 'तुळजाभवानीकडून मला आणि माझ्या शिवसैनिकांना ऊर्जा मिळते, मी तुळजापूरला येऊन ऊर्जा घेऊन जातो. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन मी विधानभवनावर भगवा फडकवणारच', असे बाळासाहेब तुळजापूरच्या सभेत म्हणायचे. एकदिवस नक्कीच तुळजापूरचा आमदार शिवसेनेचा असेल, असेही बाळासाहेब म्हणायचे. मात्र, बाळासाहेबांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. 

तुळजापूर अन् शिवसेना

तुळजापूरचे ज्येष्ठ पत्रकार गोविंद कुरुड यांनी 'लोकमत डॉट कॉम'शी बोलताना सांगितले की, 1990-95 सालच्या विधानसभेसाठी बाळासाहेबांची पहिली सभा होती, तुळजापूरचे पहिले उमेदवार अनंत शहाजी कदम यांनी बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन निवडणूक लढवली. तेव्हापासून. तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन विधानसभेवर भगवा फडकावयचा असं बाळासाहेब तुळजापूरच्या प्रत्येक सभेत सांगायचे. तीन वेळेस त्यांनी तुळजापुरात सभा घेतली. त्यानुसार, शेवटची सभा 1999-2000 साली घेण्यात आली. 2004 साली तुळजापूरजवळील जळकोट येथे जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के आणि माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी हे तुळजापूर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार होते. हा काळ शिवसेनेसाठी विजयी उमेदवार देणारा होता. पण, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. याप्रकरणाची बाळासाहेबांनी जातीनं चौकशी केली, तसेच 2004 साली राष्ट्रवादीतून आलेल्या नरेंद्र बोरगावकर यांना उमेदवारी दिली. मात्र, तेव्हाही शिवसेनेला पराभव पत्कारावा लागला.  

मधुकर चव्हाण यांचं वर्चस्व

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी 1999 ते 2014 सालापर्यंत या मतदारसंघातून सलग 4 वेळा विजय मिळवला. विशेष म्हणजे दर पंचवार्षिकला चव्हाण यांचं मताधिक्य वाढतच गेलंय. चव्हाण यांनी 8 वेळा विधानसभा निवडणूक लढवली. त्यामध्ये एकदा केवळ उस्मानाबाद मतदारसंघातून ते उमेदवार होते. तर, सातवेळेस तुळजापूर मतदारसंघातून ते आमदार बनले आहेत. चव्हाण यांच्याविरुद्ध येथे शिवसेना उमेदवाराला यश कधीच प्राप्त झालं नाही. कारण, येथील उमेदवार तगडे नसतात, आर्थिक दृष्ट्याही कमकुवत असतात, याचा फटका शिवसेनेला बसतो, असे तुळजापूरचे ज्येष्ठ पत्रकार गोविंद कुरुड यांनी सांगितलं.   

'जय भवानी' फक्त घोषणेपुरती?

उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आणदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी मोठ्या चलाखीने उस्मानाबादची जागा आपल्या पदरात पाडून घेतली. राणाजगजितसिंह पाटील यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला 124 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाने 150 जागा स्वत:ला घेतल्या असून मित्रपक्षाला 14 जागा दिल्या आहेत. या तहामध्ये बाळासाहेबांचं श्रद्धास्थान असलेलं तुळजापूर शिवसेनेनं गमावलंय. या मतदारसंघातील अपयशाची बेरीज जुळवताना उद्धव ठाकरेंनी भवानीमातेचा विसर पडल्याचं दिसून येतंय. तुळजापूर मतदारसंघ युतीत नेहमी शिवसेनेकडे राहिला. कारण बाळासाहेब ठाकरे यांची आई तुळजाभवानीबद्दल असलेली भक्ती. हरलो तरी चालेल, पण हा मतदारसंघ सेनेकडेच कसा राहील हे स्वतः बाळासाहेब जातीने पाहायचे. हल्लीच्या सेना नेत्यांनी हा मतदारसंघ भाजपला सहजच आंदण दिला. त्यामुळे तुळजाभवानीच्या तुळजापूरात आणि विधानसभेवर भगवा फडकविण्याचे बाळासाहेबांचं स्वप्न अपूर्णच राहिलं आहे. तर, शिवसेनेत 'जय भवानी' हा नारा आता फक्त घोषणेपुरताच उरलाय, असंच म्हणावं लागेल.

बाळासाहेबांनी गरीब अन् शेतकरी कुटुंबातील मुलांना उमेदवारी देऊन विधानसभेत पोहोचवले. परभणीचे बंडू जाधव, हदगावचे सुभाष वानखेडे, दारव्याचे संजय राठोड, जळगावचे गुलाबराव पाटील यांच्यासारखे सर्वसामान्य तरुण कार्यकते शिवसेनेचे आमदार झाले, जे आज खासदार आणि राज्यमंत्री आहेत. ही ताकद होती बाळासाहेबांची. ही ताकद होती, बाळासाहेबांच्या शिवसेनेची. ही ताकद होती बाळासाहेबांच्या एका सभेची. पण, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या बाण्याची उणीव जाणवतेय. 'अॅडजस्टमेंट' आणि 'मॅनेजमेंट'चं राजकारण आताच्या शिवसेनेत दिसून येतंय. त्यामुळेच, आता बाळासाहेबांची शिवसेना उरली नाही, असं कळत-नकळत शिवसैनिकांकडून बोललंही जातंय.

टॅग्स :शिवसेनाबाळासाहेब ठाकरेउद्धव ठाकरेतुळजापूरविधानसभा निवडणूक 2019मुंबईभाजपाराणा जगजितसिंह पाटील