'उद्धव ठाकरेंना बरं होण्यास 2-3 महिने लागतील, मुख्यमंत्र्याचा पदभार फडणवीसांना द्यावा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 16:49 IST2021-12-27T16:47:21+5:302021-12-27T16:49:11+5:30
मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? यासंदर्भाने आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना रामदास आठवलेंनी चक्क विरोधी पक्षनेत्यांचच नाव घेतलं आहे

'उद्धव ठाकरेंना बरं होण्यास 2-3 महिने लागतील, मुख्यमंत्र्याचा पदभार फडणवीसांना द्यावा'
मुंबई - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे आपल्या विधानांमुळे आणि कवितेमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा जे आहे ते स्पष्ट बोलतात. संसद सभागृह असो किंवा राज्यातील एखाद्या गावातील कार्यक्रमत त्यांचे भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आताही रामदास आठवले यांनी हास्यास्पद विधान केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृती अस्वस्थेमुळे घरीच आराम करत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याची मागणी आठवलेंनी केली आहे.
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होत असून या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली आहे. त्यावरुन, भाजप नेते वारंवार महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा पदभार इतर नेत्यांकडे देण्याची मागणीही भाजपा नेत्यांकडून होत आहे. त्यातच, आता केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा विनोदी विधान केलं आहे.
मुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रिपद इतर कोणाकडे सोपवावं? यासंदर्भाने आठवलेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना रामदास आठवलेंनी चक्क विरोधी पक्षनेत्यांचच नाव घेतलं आहे. 'मला वाटतं की मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीसांकडे द्यावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठीकठाक होण्यासाठी २-३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे,' असं आठवलेंनी म्हटलं.
महाविकास आघाडी सरकार लवकरच जाईल
पत्रकार महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडेल आणि राज्यात लवकरच भाजप-सेना युतीचे सरकार येईल असे भाकीतही रामदास आठवलेंनी केले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वीच सत्ताबदलाचे सुतोवाच केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मार्चपर्यंत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल असे सांगितले होते. आठवले यांनी या नेत्यांच्या वक्तव्यांना दुजोरा दिला. तसेच, महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच जाईल, असे म्हटले होते.