Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून इतका द्वेष हे अतिशय दुर्दैवी, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 09:31 IST

मशिदीवरील भोंग्यांविरोधात आज मनसेचं आंदोलन सुरू असून पहाटे मशिदींसमोर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम ठिकठिकाणी घेण्यात येत आहे.

मुंबई

मशिदीवरील भोंग्यांविरोधात आज मनसेचं आंदोलन सुरू असून पहाटे मशिदींसमोर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम ठिकठिकाणी घेण्यात येत आहे. त्याविरोधात पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात येत आहे. मनसेच्या याच आंदोलनाबाबत बोलताना मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 

"स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून इतका द्वेष करणं हे अतिशय दुर्दैवी आहे. फक्त महाराष्ट्र आणि मुंबईतच हनुमान चालीसाचा प्रकार कशासाठी? त्यांना खरंच जर भोंगे उतरवायचे असतील तर केंद्राला सांगा. संपूर्ण देशभरात निर्णय व्हायला हवा. केवळ मतांच्या राजकारणासाठी यांना महाराष्ट्र आणि मुंबई दिसतंय का?", अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. 

शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अजूनही ठाम असून नकली हिंदुत्ववाल्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करू नये, असंही त्या म्हणाल्या. शिवसेना प्रमुखांनी सांगितलेल्या मार्गावरच आम्ही चालत आहोत. हिंदुत्व घंटाधारी नव्हे गदाधारी हिंदुत्व हवं आणि त्याच मार्गावर शिवसेना काम करत आली आहे, असंही त्या म्हणाल्या. 

बाळासाहेबांचा दाखले मनसेनं देऊच नयेत"ज्यांनी बाळासाहेब हयात असताना त्यांना त्रास दिला. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा दाखला तर देऊनच नये. अशांनी शिवसेनेला बाळासाहेबांचा मार्ग दाखवूच नये", असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. बाळासाहेबांच्या विचारांची एवढीच चिंता मनसेला वाटू लागली असेल तर ते हयात असताना त्यांना त्रास का दिला?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

टॅग्स :किशोरी पेडणेकरराज ठाकरेमनसेउद्धव ठाकरे