Join us  

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेंनीच लिहिली का?; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 9:08 AM

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी जवळपास पूर्ण पक्षच रिकामा केल्याचे चित्र आज दिसत आहे.

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित बंडाची स्क्रिप्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिली का, याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियात होत आहे. ठाकरे यांची या बंडाला मूकसंमती असल्याचे बोलले जात आहे. तसे नसते तर जवळपास ५० आमदार शिंदे यांच्यासोबत गेले नसते असेही म्हटले जात आहे. 

शिवसेनेच्या काही आमदारांचा काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्यास सुरुवातीपासूनच विरोध होता हे खरे असले तरी भाजपने आपल्याला पाच वर्षांत त्रास दिला, आपले खच्चीकरण केले, आता भाजपची साथ नकोच अशी भावना असलेलेही बरेच आमदार होते. गेल्या अडीच वर्षांत भाजपच्या नेत्यांनी ठाकरे यांच्यावर आरोप केले तेव्हा अत्यंत त्वेषाने भाजप नेत्यांवर टीका करणारे आमदारदेखील आज शिंदे यांच्यासोबत कसे काय, याची चर्चा रंगत आहे. 

शिंदे यांच्यासोबत फारतर १५ ते २० आमदार आहेत आणि ते बंड करणार नाहीत, कारण तसे केले तर आमदारकी गमवावी लागेल, असे भाजपचे नेतेही खासगीत पत्रकारांना सांगत आले आहेत. मात्र, शिंदे यांनी जवळपास पूर्ण पक्षच रिकामा केल्याचे चित्र आज दिसत आहे. वर्षानुवर्षे अत्यंत निष्ठावंत राहिलेले आमदारही त्यात आहेत. शिवसेना, भगव्याची साथ सोडणे त्यांच्या मतदारसंघातही त्यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही, तरीही त्यांनी जोखीम पत्करली. असे म्हटले जाते की, राष्ट्रवादीचे वाढते वर्चस्व मुख्यमंत्र्यांनाही खटकत होते. 

सरकार चालविताना राष्ट्रवादीचे लोक दादागिरी करतात. त्याचा फटका सेनेला मोठ्या प्रमाणात बसेल हे त्यांच्या पुरते लक्षात आले होते. मात्र त्याचवेळी स्वत: सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला असता तर त्यांच्यावर टीकेची प्रचंड झोड उठली असती म्हणून शिंदे यांच्या माध्यमातून ठाकरे यांनीच आपल्या भूमिकेला वाट करून दिली असावी, असे म्हटले जात आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ही थिअरी पूर्णत: फेटाळून लावली. असे कपट उद्धव ठाकरे कधीही करणार नाहीत, असे ते म्हणाले.

हेही प्रश्न झाले उपस्थित-

तथापि, ही थिअरी मान्य नसणाऱ्यांचे असे म्हणणे आहे, की भाजपसोबत जाण्यासाठी ठाकरे स्वत:चे नेतृत्व धोक्यात का आणतील? भाजपला मुख्यमंत्रीपद मिळू नये म्हणून ते राष्ट्रवादी व काँग्रेससोबत गेले होते. भाजप, केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेतील नेते व ठाकरे परिवाराला एवढा त्रास दिला जात असताना ते शिंदे यांना बहुसंख्य आमदार सोबत घेऊन भाजपसोबत जाण्यास सांगणारच नाहीत, असाही एक तर्क दिला जात आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार