‘हा कटाचा भाग आहे की, काेणाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले’; कुर्ला अपघातात पोलिसांचा असाही युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 06:12 IST2024-12-11T06:12:09+5:302024-12-11T06:12:27+5:30

कुर्ल्यात दिवसभर बेस्ट आली नाही. अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.

'It is part of the conspiracy, at whose behest he did this deed'; This is also the argument of the police on Kurla Bus Accident | ‘हा कटाचा भाग आहे की, काेणाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले’; कुर्ला अपघातात पोलिसांचा असाही युक्तिवाद

‘हा कटाचा भाग आहे की, काेणाच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केले’; कुर्ला अपघातात पोलिसांचा असाही युक्तिवाद

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : आरोपी चालक संजय मोरे याने केलेला गुन्हा हा अत्यंत गंभीर आहे. गुन्हा करण्याचा त्याचा नेमका काय हेतू होता? त्याने बसचा हत्यारासारखा वापर करून गाडीचा वेग वाढवून नागरिकांना चिरडले आहे का? तो कोणत्या कटात सहभागी आहे किंवा त्याच्या कटात इतर कोण सहभागी आहे का? अथवा त्याने कोणाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले याबाबत तपास करणे बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीत, अटक आरोपी मोरे चालवत असलेल्या बेस्ट बसचे आवश्यक प्रशिक्षण त्याने घेतले आहे का, याबाबतचा तपास करणे आवश्यक आहे. गुन्ह्यातील अपघातग्रस्त बेस्ट बसची परिवहन विभागाकडून तपासणी करणे बाकी आहे. आरोपी मोरे याने केलेल्या अपराधाची कृती ही सदोष मनुष्यवधाची आहे. तसेच, आरोपी मोरे गुन्हा करतवेळी अंमली पदार्थाच्या सेवनाखाली होता किंवा काय याबाबत तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी आरोपी चालक मोरे याची कोठडी मागताना न्यायालयाला सांगितले.

मृतांच्या वारसांना ५ लाख : फडणवीस 
अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. तसेच, जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि ‘बेस्ट’ने करावा, असे आदेश त्यांनी दिले. दुर्घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आराेपीला २१ डिसेंबरपर्यंत पाेलिस काेठडी
कुर्ला पश्चिमेच्या एस. जी. बर्वे मार्गावर सोमवारी रात्री घडलेल्या भीषण बेस्ट बस दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर पोहोचली असून ४२ जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. त्यांत चार पोलिसांचा समावेश आहे. तर बेफाम बस चालवून अपघातास कारणीभूत ठरलेला बेस्टचा कंत्राटी चालक संजय मोरे (५४) याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  

अपघात कसा घडला? 
अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरे हा ‘कंत्राटी चालक’ आहे. त्याला इलेक्ट्रिक बस चालविण्याचा फारसा अनुभव नव्हता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. 
मोठी इलेक्ट्रिक बस चालविण्याचे केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर १ डिसेंबरपासून त्याला ही बस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नसल्यामुळेच त्याचा पाय ब्रेकऐवजी एक्सलेरेटरवर पडला आणि अनर्थ घडला, असे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. 

बेस्टने खबरदारी घ्यावी : शिंदे
अपघातातील मृतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांना जखमींचीही विचारपूस केली. 
दुर्घटनेची नेमकी कारणे शोधून योग्य ती कारवाई आणि उपाययोजना केली जाईल. 
बेस्टसारख्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेने भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी खबरदारी घ्यायला हवी, असे शिंदे म्हणाले.

Web Title: 'It is part of the conspiracy, at whose behest he did this deed'; This is also the argument of the police on Kurla Bus Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात