Join us  

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाला; राज ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 7:32 PM

प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. मात्र दूसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष हा वाटणं, हे कधी महाराष्ट्रात नव्हतं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबई: लोकसंख्या वाढीसाठी राजकारणीच जबाबदार आहेत. जोपर्यंत आपण देशाच्या लोकसंख्येवर विचार करत नाही तोपर्यंत हे प्रश्न कधीच सुटणार नाही. राजकीय पक्ष कोणतेही असले तरी काही गोष्टींवर एकमताने विचार करणयाची गरज आहे, असं स्पष्ट मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात ते बोलत होते.  

देशाच्या विकासात लोकसंख्या एक महत्वाचा अडथळा ठरत असून ती नियंत्रणात आणण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. देशातील जनतेला कमी मुलं झाल्यास फायदे देणार आहात सांगत प्रोत्साहन पण द्यावं लागेल असं सांगताना राज ठाकरेंनी याकडे आपण हिंदू, मुस्लिम असं पाहू नये असंही आवाहन केलं. “दारु पिऊन गाडी चालवल्यावर सक्ती करता. जेलमध्ये टाकता किंवा दंड घेता. यामुळे दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या कमी झाली. चांगल्या गोष्टींसाठी सक्ती करावी लागते. लोकशाही काही गोष्टींसाठी मारक ठरत असेल तर काही निर्णय घ्यावे लागतील. काही विषयांमध्ये केली नाही तर हे प्रश्न कधीच सुटणार नाही, असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्रामध्ये जाती पहिल्यापासून होत्या. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल एक अभिमान होता. तसेच जातीवरती मतदानही व्हायचं आणि ते आजही होतं. मला सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये असं दिसतं की, लोकांना जातीबद्दल अभिमान हा आहेच, पण दूसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत गेला आहे. हे महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतीला डाग लावणार चित्र आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. मात्र दूसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष हा वाटणं, हे कधी महाराष्ट्रात नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं. जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात जातीचा मुद्दा हा सर्वांथाने मोठा झाला असेल, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर. कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कोणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

हातात मोबाइल येणं याला प्रगती मानत नाही- 

आजही निवडणुकांमध्ये विषय बदललेले नाहीत. आजही चांगले रस्ते, पाणी, वीज, शिक्षण देऊ असं सांगितलं जातं. पण मग आपण नक्की प्रगती कुठून गेली, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. प्रगती आपण नक्की केली आहे. पण याचा अर्थ रस्ते बांधणं, पूल बांधणं, हातात मोबाइल येणं याला प्रगती मानत नाही. देश म्हणून विचार करताना काही वैचारिक प्रगती झाली का? आपल्या देशात प्रगतीच्या व्याख्या काय आहे, असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

खासदार सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा-

आणीबाणीच्या काळ देशाला न शोभणारा काळ असं बोललं जातं. आणीबाणीचा काळाची आजही चर्चा होते. सध्याही तशीच परिस्थिती देशात दिसून येते आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. आज सर्रासपणे केंद्रीय संस्थांचा गैरवापर होताना दिसतो आहे. अनेकांवर सूडबुद्धीने कारवाई होताना दिसतेय. मागे एका वर्तमानपत्रांवर ईडीची छापेमारी झाली. काही पुस्तकांना टोकाचा विरोध  होतांना दिसतो. अशा घटना समोर येत आहेत. गेल्या पाच-सात वर्षात ही अस्वस्थता समोर येत आहे. या गोष्टी माझ्यासाठी आणि माझ्या सारऱ्या अनेकांसाठी खुप नवीन आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हणत केंद्र सरकारवर टीका केली. 

टॅग्स :राज ठाकरेशरद पवारमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसमनसे