पेपर सोडवणारा हा तोच ना?; आता बायोमेट्रिक पडताळणी होणार

By दीपक भातुसे | Updated: February 5, 2024 06:41 IST2024-02-05T06:40:20+5:302024-02-05T06:41:01+5:30

डमी उमेदवारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाचे पाऊल

Isn't he the one who solves the paper? Biometric verification will be done | पेपर सोडवणारा हा तोच ना?; आता बायोमेट्रिक पडताळणी होणार

पेपर सोडवणारा हा तोच ना?; आता बायोमेट्रिक पडताळणी होणार

दीपक भातुसे

मुंबई : पेपरफुटी आणि डमी उमेदवारीने ग्रासलेल्या शासकीय नोकरभरतीत पारदर्शकता राहावी, म्हणून आरोग्य विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून प्रत्यक्ष परीक्षेस बसलेला उमेदवार आणि निवड झालेला उमेदवार यांची बायोमेट्रिक पडताळणी केली जाणार आहे. परीक्षेस एखादा डमी उमेदवार बसला असल्यास या पडताळणीतून ती बाब उघडकीस येणार आहे.

राज्य सरकारच्या वतीने २८ ऑगस्ट २०२३ रोजी आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गातील एकूण १०,९४९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. याची ऑनलाइन परीक्षा ३० नोव्हेंबर २०२३ ते १२ डिसेंबर २०२३ दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा घेताना परीक्षा केंद्रावर उमेदवारांचे बायोमेट्रिकद्वारे हाताच्या बोटांचे ठसे व फोटो घेण्यात आले होते. 

दहा संवर्गांतील नियुक्त्या ८ फेब्रुवारीपर्यंत

आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेअंतर्गत १० संवर्गांतील पदांसाठी अंतरिम निवड व प्रतीक्षा याद्या आणि गुणवत्ता याद्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 
या दहा संवर्गांत आहारतज्ज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहायक, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहायक, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृह नि वस्त्रपाल, ग्रंथपाल, आदी पदांचा समावेश आहे. 
या दहा संवर्गांतील नियुक्त्या येणाऱ्या ८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून, उर्वरित संवर्गांतील अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी ८ दिवसांत लावण्यात येणार असून, नियुक्त्याही लवकरच करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

पडताळणी कधी करणार?
nआरोग्य विभागाने निवड यादी प्रसिद्ध केली असून निवड यादीतील उमेदवारांचे बायोमॅट्रिकद्वारे घेतलेल्या बोटांचे ठसे व फोटो व प्रत्यक्ष परीक्षेस बसलेल्या उमेदवारांचे बोटांचे ठसे व फोटो यांची अंतिम तपासणी करण्यात येईल. 
nकागदपत्रे तपासणीवेळी हे केले जाणार असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक केंद्राकरिता एका निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. 

सरळसेवा भरतीत सर्व विभागांनी याप्रकारे पडताळणी केल्यास डमी उमेदवारांवर चाप बसेल. यामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकेल. 
- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

कोणती काळजी?
परीक्षाची जबाबदारी असलेल्या टीसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रिक्स हजेरी, आयरीस तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) यांच्याकडून केंद्रामध्ये परीक्षेच्या कालावधीत ५-जी मोबाईल जॅमर्सची व्यवस्थाही होती.

Web Title: Isn't he the one who solves the paper? Biometric verification will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.