Mumbai: तुमचा भाडेकरू बांगलादेशी नाही ना? कागदपत्रांची पडताळणी न करणे पडेल महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:59 IST2025-11-22T12:58:29+5:302025-11-22T12:59:10+5:30
मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे; तर संपूर्ण देशातच बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे.

Mumbai: तुमचा भाडेकरू बांगलादेशी नाही ना? कागदपत्रांची पडताळणी न करणे पडेल महागात!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई किंवा महाराष्ट्रातच नव्हे; तर संपूर्ण देशातच बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. बांगलादेशातील गरिबी आणि उपासमारीला कंटाळून बांगलादेशी घुसखोर अवैध मार्गाने सीमारेषा ओलांडून भारतात येत असल्याचे चौकशीत समोर येत आहे. या वर्षी बांगलादेशी घुसखोरांविरोधात ४०१ गुन्हे नोंदवत १००१ जणांना प्रत्यार्पित केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
दरी, डोंगर, जंगल पार करून बांगलादेशी मुंबईत विविध ठिकाणी वास्तव्यास आहे. अनेक जण येथे काम करून लखपती झाल्याचेही वेळोवेळी कारवाईतून समोर आले. पोलिसांकडून बांगलादेशीवर धडक कारवाई सुरू आहे. बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात. त्या काळात घुसखोर बांगलादेशी नागरिक विविध सरकारी योजनांचा फायदा घेतात. त्यांच्या बँक खात्यातून बेकायदा व्यवहारही झाल्याचे दिसून आले आहे.
...तर मालकावरही कारवाई
अनेक घर मालक जास्तीच्या घर भाड्यासाठी कागदपत्रांची पडताळणी न करताच घर भाड्याने देतात. त्यामुळे अशा घर मालकावर देखील पोलिसांकडून वेळोवेळी कारवाईचा इशारा देण्यात येत आहे. खाते बंद करण्यासाठी नोटीस अनेक बांगलादेशी भारतात स्थीर झाल्यानंतर त्यांच्या इतर बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थायिक करण्याचे बेकायदा काम करतात. घुसखोरांना कागदपत्रे संपूर्ण साखळीविरोधातच कारवाई करण्यास एटीएस, पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत संशयित बांगलादेशींची बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली आहे.
परदेशी नागरिकांशी चौकशी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशात विविध कारणांनी आलेल्या परदेशी नागरिकांची विशेष चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार मुंबईत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पडताळणी करून थेट मायदेशी पाठविण्यात आले.
शिधावाटप पत्रिका, परवानेही रद्द
भारतीय शिधावाटप पत्रिका, वाहन चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधीत विभागांशी पत्रव्यवहार केला जातो. याशिवाय परिवहन विभागाशीही संपर्क साधून अशा संशयीतांचे चालक परवानेही रद्द करण्यात येत आहे. बांगलादेशी घुसखोरांचे भारतातील वास्तव्यावर 3 मर्यादा आणण्याचे काम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी बांगलादेशी घुसखोरांची सर्वबाजूंनी कोंडी करण्यात सुरुवात केली.