ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 17:37 IST2025-09-29T17:35:05+5:302025-09-29T17:37:12+5:30
Thackeray Group And MNS: ठाकरे गट आणि मनसे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आमचाच महापौर असेल, असे दावे केले आहेत.

ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
Thackeray Group And MNS: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरून ठाकरे गट, मनसे, शिवसेना शिंदे गट, भाजपासह अन्य पक्षही जोरदार तयारीला लागले आहेत. विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून भाजपाने मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यातच भाजपा महायुती आणि ठाकरे गट-मनसेकडूनही महापौर पदावरून दावे केले जात आहेत. ठाकरे बंधूंची युती अधिकृतपणे जाहीर झाली नसली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच ठाकरे बंधूंची युतीचे कशातच काही नसताना उद्धवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांकडून महापौर पदावर दावे केल्याचे पाहायला मिळत आहे.
अमित शाह म्हणतात की, भाजपाचा महापौर मुंबईत होईल. याचाच अर्थ तो मराठी माणूस असणार नाही. या गोष्टीला एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. परंतु, आम्ही सांगतो की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून मुंबईवर मराठी माणसाचा भगवा फडकेल आणि मराठीच महापौर होईल. हे आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासह दिल्लीकरांनाही देत आहे. जा, तुम्ही काय करायचे ते करा, मुंबईत मराठी माणूसच महापौर होईल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला होता. यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही महापौर पदावर भाष्य केले आहे.
मनसेचाच महापौर होणार
शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी महापौर शिवसेनेचाच होणार, अशा आशयाचे बॅनर लावले होते. यावर पत्रकारांनी संदीप देशपांडे यांना प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, मुंबईचा महापौर मराठी माणूस होणार आणि मनसेचाच महापौर होणार. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनीही मुंबई मनपावर शिवसेनेचाच भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. मेळाव्यात बोलताना शिंदेंनी महायुतीचा महापौर होणार असल्याचे भाकीत केले.
दरम्यान, ठाकरे मुंबईच्या विकासावर बोलत नाहीत. त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीच नाही. माझे शब्द लिहून घ्या. व्हिडीओ रेकॉर्ड करा. तो जपून ठेवा आणि नंतर सगळीकडे दखवा की, काहीही झाले तरी मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार आहे. काहीही झाले तरी मुंबई पालिकेवर महायुतीचेच सरकार येणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या विजय संकल्प मेळाव्यात ठणकावून सांगितले होते.