मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 06:03 IST2026-01-13T06:03:20+5:302026-01-13T06:03:20+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी अनेक मतदारांना मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला.

मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यासंदर्भातील संदिग्धता महापालिका निवडणुकीतही कायम आहे. मतदान केंद्रावर मोबाइल बंदीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेश नसल्याने महापालिकेनेही काही सूचना जारी केलेल्या नाहीत. मात्र, मतदारांनी शक्यतो मतदान केंद्रावर मोबाइल नेऊ नये आणि घेऊन गेलात तर तो स्विच ऑफ ठेवा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मोबाइल दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी अनेक जण मोबाइल घेऊन जातात. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी अनेक मतदारांना मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला.
शिवाय, मतदान केंद्रावर मोबाइल सुरक्षित ठेवण्याची कोणतीही सोय नसल्याने अनेक मतदान केंद्रांवरून नागरिक मतदान न करताच माघारी परतले. काही ठिकाणी मात्र मतदारांना मोबाइल घेऊन प्रवेश देण्यात आला. निवडणूक आयोगाने मतदानाच्या वेळी मोबाइल बाळगण्यासंदर्भात स्पष्ट सूचना जारी न केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. हाही संभ्रम कायम आहे.
'मोबाइल बाळगू नका'
मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जावा की नाही, यासंदर्भात स्पष्ट सूचना अपेक्षित असताना संभ्रम कायम आहे. मोबाइल नेण्यास मज्जाव केल्यास तो ठेवण्याची सोय नसल्याने मतदार मतदानापासून वंचित राहतील. त्यामुळे मतदारांनी शक्यतो मतदान केंद्रावर मोबाइल घेऊन जाऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.