सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबई बाहेर फरार? पोलिसांनी लोकल अन् एक्सप्रेस गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:47 IST2025-01-18T10:46:23+5:302025-01-18T10:47:32+5:30
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला करणारा आरोपी मुंबईतून पळून गेला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

सैफवर हल्ला करणारा आरोपी मुंबई बाहेर फरार? पोलिसांनी लोकल अन् एक्सप्रेस गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुंबईपोलिसांना अद्याप हल्लेखोराला अटक करण्यात यश आलेले नाही. घटनेला ४८ तास उलटूनही आरोपींची माहिती मिळालेली नाही. घटनेनंतर लगेचच आरोपीने वांद्रे रेल्वे स्थानकावरून लोकल किंवा एक्सप्रेस ट्रेन पकडली, असा पोलिसांचा अंदाज आहे. तो एकतर मुंबई सोडून बाहेर गेला आहे किंवा आजूबाजूच्या परिसरात लपून बसला असेल, असा पोलिसांचा अंदाज आहे.
मुंबईत 'छावा' जन्मला..! १४ वर्षांची प्रतिक्षा संपली; मानसी सिंहीण बनली आई
मुंबई पोलिसांना संशयिताचा एक नवीन फोटो मिळाला आहे, तो रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून घेतला आहे. आरोपी वारंवार कपडे बदलत असल्याचे पोलिसांचे मत आहे. आरोपी पोलिसांना अजूनही गुंगारा देत आहे, त्यामुळे हा सराईत गुन्हेगार असल्याचा दावा पोलिसांनी केला. आतापर्यंतच्या तपासात आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळून आलेली नाही. तसेच त्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल कोणतीही माहिती गोळा करता आली नाही. या प्रकरणात पोलिसांना तांत्रिक नेटवर्ककडून कोणतीही मदत मिळत नाही.
मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या एकूण ३५ पथके आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके आणि एक्सप्रेस ट्रेन थांब्यांवरील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे. आरोपी दुसऱ्या राज्यात गेला आहे का याचाही पोलीस शोध घेत आहेत.
१२ जानेवारी रोजी वर्सोवा परिसरात झालेल्या चोरीच्या प्रकरणातील आरोपी शाहिदचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत कोणताही थेट पुरावा सापडला नसला तरी, पोलिसांनी शाहिदला क्लीन चिट दिलेली नाही. पोलीस आता वर्सोवा सोसायटी आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी करत आहेत.
मुंबई पोलिसांचे पथक सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी पोहोचले आहे आणि त्यांचे जबाब नोंदवले आहेत, शिवाय सैफच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ४०-५० लोकांची चौकशी केली आहे, त्यापैकी बहुतेक जण सैफचे ओळखीचे असल्याचे सांगितले जाते.
सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली
या हल्ल्यात सैफच्या कर्मचाऱ्यांपैकी कोणी सहभागी आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत. ४८ तासांनंतरही मुंबई पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले नाही. आता पोलिस लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी त्यांना दिशाभूल करण्यासाठी वारंवार कपडे बदलत आहे.
दरम्यान, या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे सरकारचे प्राधान्य आहे. पोलिसांनी या प्रकरणात वेगाने काम केले आहे आणि लवकरच आरोपींना अटक केली जाईल.