भारतासह मुंबईत आजपासून आयफोन १७ सिरीज आणि इतर अॅपल उत्पादनांची विक्री सुरू झाली. दरम्यान, मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली येथील अॅपल स्टोअर्सबाहेर पहाटेपासूनच ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली. पहिल्याच सेलमध्ये आयफोन विकत घेण्याची चढाओढ इतकी वाढली की, मुंबईतील बीकेसी येथील अॅपल स्टोअरबाहेर काही तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली. अखेर, त्यांना थांबवण्यासाठी सीआरएफ आणि स्टोअरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करावा लागला.
पीटीआय वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये काही तरुण एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर सीआरएफ आणि स्टोअरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्यांना थांबवले. परंतु, त्यावेळी एका तरुणाने सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की केली. या गोंधळामुळे काही काळासाठी स्टोअरच्या कामकाजावर परिणाम झाला, मात्र, काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली. अॅपलकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या घटनेमुळे आयफोनसाठी भारतीय ग्राहकांमध्ये असलेल्या उत्साहाची आणि क्रेझची झलक पुन्हा एकदा दिसून आली, पण त्याचसोबत सुरक्षेच्या दृष्टीने अॅपल आणि पोलीस यंत्रणांसाठीही धोक्याची घंटा वाजली आहे.
९ सप्टेंबर रोजी अॅपलने 'अवे ड्रॉपिंग' कार्यक्रमात आयफोन १७ मालिकेचे चार मॉडेल्स आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स लॉन्च केले आहेत. आजपासून या सर्व मॉडेल्सची विक्री भारतातही सुरू झाली. या निमित्ताने मुंबईतील बीकेसी येथील अॅपल स्टोअरबाहेर पहाटेपासूनच ग्राहकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.
आयफोन १७ मालिका: किंमत
आयफोन १७ ची २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८२ हजार ९०० रुपये आहे. आयफोन एअरची किंमत १ लाख १९ हजार ९०० रुपये आहे. आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स अनुक्रमे १ लाख ३४ हजार ९०० रुपये आणि १ लाख ४९ हजार ९०० रुपयांत उपलब्ध आहे. कंपनीने सर्व फोन २५६ जीबीच्या बेस व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहेत.