मुंबईतील सामुहिक बलात्कार घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करा - खासदार सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 14:22 IST2019-08-30T14:21:20+5:302019-08-30T14:22:12+5:30
देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध करत या घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली.

मुंबईतील सामुहिक बलात्कार घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करा - खासदार सुप्रिया सुळे
मुंबई - जालना येथील 19 वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबूर येथे सामुहिक बलात्कार केल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे. खासदार सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्वात आज चेंबूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या.
देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध करत या घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली. राज्यात अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणि जालना जिल्हयातील १९ वर्षीय मुलीवर मुंबईतील चेंबूर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामुहिक बलात्कार केला होता. त्यात एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलीचा जगण्याशी संघर्ष गुरुवारी संपला. औरंगाबादच्या घाटी शासकीय रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून मुंबईमध्ये सरकारविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला.
जालना( घनसावंगी )येथील १९ वर्षीय मुलीवर चेंबूर येथे चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेची एसआयटी चौकशी करावी या मागणीसाठी खा.@supriya_sule व @NCPspeaks मुंबई अध्यक्ष @nawabmalikncp यांच्या नेतृत्वाखाली, छगन मिठा पेट्रोल पंप ते चुनाभट्टी पोलिस ठाणे मोर्चा काढण्यात आला. pic.twitter.com/pSTsQCKL8W
— NCP Mumbai (@MumbaiNCP) August 30, 2019
चेंबुर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईमध्ये राष्ट्रवादीने काढलेल्या सरकार विरोधातील मोर्चामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा आल्यावर पोलिसांनी तो अडवला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन त्या नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसं नाही झालं तर यापेक्षा मोठया पध्दतीचा व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
तसेच या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करतानाच जोपर्यंत त्या पिडीत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांशी चर्चा करुन आल्यावर माध्यमांशी बोलताना दिला आहे. दरम्यान पिडीत मुलीच्या भावाला घेवून पोलिस महासंचालकांची भेट राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली.