कार चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश! राजस्थानमधून दोघांना अटक; दोन गाड्याही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 16:23 IST2025-04-14T16:22:49+5:302025-04-14T16:23:01+5:30

पोलिसांनी कारवाई दरम्यान दोन चोरीची वाहने हस्तगत केली आहेत.

Interstate car theft gang busted Two arrested from Rajasthan | कार चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश! राजस्थानमधून दोघांना अटक; दोन गाड्याही जप्त

कार चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश! राजस्थानमधून दोघांना अटक; दोन गाड्याही जप्त

मुंबई : खार पोलिसांनी वाहनांच्या चोरीत सहभागी असलेल्या आंतरराज्यीय टोळीतील दोन सदस्यांना राजस्थानमधील जोधपूरमधून अटक केली. ही टोळी प्रामुख्याने इको कारची चोरी करून त्याचे इंजिन आणि चासिस क्रमांकाचा वापर भंगारमधील वाहनांसाठी वापरत होते. भवरदास वैष्णव (५४) आणि जितेंद्र तीर्थदास साधनानी ऊर्फ जीतू (४२) अशी आरोपींची नावे असून, ते जोधपूरचे रहिवासी आहेत. पोलिसांनी कारवाई दरम्यान दोन चोरीची वाहने हस्तगत केली आहेत.

दोन्ही आरोपींवर आधीपासूनच होते गुन्हे दाखल

भवरदासवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये वाहन चोरीचे २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यात खार, माहीम, वांद्रे, जुहू, ताडदेव, जोगेश्वरी, एन.एम. जोशी मार्ग, गोरेगाव, काशिमीरा, नालासोपारा, वालिव, भाईंदर यांचा समावेश आहे. तर त्याचा साथीदार जितेंद्रवरही वांद्रे, माहीम आणि भाईंदर येथे गुन्हे दाखल आहेत.

३० हून अधिक इको गाड्या चोरून विकल्याची कबुली

खार परिसरातून २३ आणि २७ मार्च रोजी दोन कार चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. तपासात दोन्ही प्रकरणांमध्ये चोरी करण्याची पद्धत सारखीच असल्याचे उघड झाले. यातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले होते.

खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ आणि गुन्हे निरीक्षक वैभव काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस उपनिरीक्षक हणमंत कुंभारे, कॉन्स्टेबल दिनेश शिर्के, कुंदन कदम, महेश लहामगे, विशाल भामरे, सुमित अहिवळे, मनोज हांडगे आणि स्वप्निल काकडे यांचे पथक जोधपूरपर्यंत पोचले. त्यांनी ३० हून अधिक इको गाड्या चोरून विकल्याचे चौकशीत समोर आले.

वाहनांची नोंदणी रद्द करा 

वाहन स्क्रैप केल्यानंतर चासिस नंबरप्लेट आणि कागदपत्रे आरटीओ कार्यालयात सादर करावी प्रक्रिया आहे. मात्र अनेक जण तसे करत नसल्याने अशा चोरांचे फावते. त्यामुळे भंगारात काढलेल्या गाड्यांची नोंदणी करावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अशी होती कार्यपद्धती

आरोपी हे बेवारस वाहनांवर लक्ष केंद्रित करत होते. पहाटेच्या वेळी वाहने चोरून राजस्थानला नेत. त्या गाडीचा इंजिन आणि चासिस क्रमांक स्क्रैप केलेल्या वाहनांच्या क्रमांकाशी बदलत होते.

नवीन ओळखपत्रे बनवून या गाड्या ते विकत होते, असे चौकशीतून समोर आले आहे. विशेष म्हणजे, शहरातील अनेक एजंट या टोळीला स्क्रॅप वाहनांची माहिती देत असल्याचे तपासात उघड झाले.
 

Web Title: Interstate car theft gang busted Two arrested from Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.