राजधानी दिल्लीत रंगले राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य; पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 06:35 IST2026-04-03T06:32:48+5:302026-04-03T06:35:59+5:30

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संसदेत उपस्थित; मात्र पटेल, तटकरेंच्या अनुपस्थितीने चर्चा

Internal Rift in NCP Surfaces in Delhi Amid Sunetra Pawar Parliament Visit | राजधानी दिल्लीत रंगले राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य; पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे चित्र

राजधानी दिल्लीत रंगले राष्ट्रवादीतील नाराजीनाट्य; पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे चित्र

नवी दिल्ली/मुंबई: राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात खा. प्रफुल्ल पटेल व खा. सुनील तटकरे यांचा अनुक्रमे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख न केल्याने आणि त्यातून या दोघांना पदावरून हटविल्याच्या बातम्या चालल्याने पक्षामध्ये नाराजीनाट्य गुरुवारी बघायला मिळाले. सुनेत्रा पवार दिल्लीत असूनही खा. पटेल त्यांच्या सोबत नव्हते. यावर पत्रकारांनी विचारले असता, ते मला कसे माहिती असणार. तुम्ही दिल्लीत असता तुम्हाला माहिती! असे उत्तर सुनेत्रा पवार यांनी दिल्याने पक्षात सगळे आलबेल नसल्याचे चित्र दिसले. तथापि, खा.पार्थ पवार यांनी दुपारी एक्सवर पोस्ट करून पटेल आणि तटकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीसाठी कारणीभूत ठरलेले ते पत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्या निधनानंतर व पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पहिल्यांदाच संसदेत आल्या होत्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी कामकाजात भाग घेतला.


'ते कुठे आहेत मला कसे माहीत असणार...' 

संसदेचे कामकाज संपल्यानंतर राज्यसभेतून बाहेर आलेल्या सुनेत्रा पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी 'तुम्ही एकट्याच आलात. बाकीचे कुणी दिसत नाही', असे विचारले. त्यावर त्या म्हणाल्या, 'ते कुठे आहेत मला कसे माहीत असणार. आपण येथे असता. आपल्यालाच माहीत असेल'. सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेत सुधा मूर्ती, डॉ. अजित गोपछडे, अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. अनिल बोंडे, प्रियंका चतुर्वेदी, रजनी पाटील, बन्सीलाल गुजर, मयंक नायक आदी खासदारांच्या भेटी घेतल्या. त्या ६ एप्रिलला बारामतीमधून विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

पटेल यांच्या निवासस्थानी घेतली भेट

गुरुवारी दिवसभर राष्ट्रवादीतील नाराजीनाट्याची चर्चा रंगली असताना रात्री उशिरा सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तिथे त्यांनी जेवण केले. जवळपास दीड तास त्या पटेल यांच्या निवासस्थानी होत्या. या भेटीत त्यांच्यात काय चर्चा झाली याचे तपशील समजू शकले नाहीत.

'ते' पत्र रद्द करा 

सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले पत्र निरस्त करावे अशी विनंती केली जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव म्हणाले, अधिवेशनात अजित पवार यांना श्रद्धांजलीचा ठराव पारित करण्यात आला होता. याचा उल्लेख त्या पत्रात नाही. यामुळे १० तारखेचे पत्र निरस्त करण्याचे वा त्यावर कारवाई न करण्याची विनंती करणार आहे.
 

Web Title : राकांपा में मतभेद: सुनेत्रा पवार के पत्र से दिल्ली में नेतृत्व पर सवाल।

Web Summary : सुनेत्रा पवार के चुनाव आयोग को लिखे पत्र में प्रमुख नेताओं के नाम छूटने से राकांपा में मतभेद। पार्थ पवार के सुलह के प्रयासों के बावजूद, पत्र रद्द करने की मांग। आंतरिक कलह के बीच सुनेत्रा बाद में प्रफुल्ल पटेल से मिलीं।

Web Title : Discord in NCP: Sunetra Pawar's letter sparks leadership questions in Delhi.

Web Summary : Sunetra Pawar's letter to the Election Commission omitting key leaders ignited NCP discord. Despite Parth Pawar's efforts to mediate, the letter's cancellation is sought. Sunetra met Praful Patel later, amidst speculation about internal rifts.