अपुरा पाणीपुरवठा, मूलभूत सुविधांचीही वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:02 IST2026-03-17T13:01:33+5:302026-03-17T13:02:03+5:30

महापालिकेकडून येथे सफाईचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे.

Insufficient water supply, lack of basic amenities | अपुरा पाणीपुरवठा, मूलभूत सुविधांचीही वानवा

अपुरा पाणीपुरवठा, मूलभूत सुविधांचीही वानवा

खलील गिरकर 

मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या देवनार पशुवधगृहाचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक १४० गोवंडी परिसर अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा हा भाग असतानाही येथील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी मिळणे जिकीरीचे झाले आहे.  महापालिकेकडून येथे सफाईचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे.

गोवंडी रेल्वे स्थानकाला खेटून असलेल्या या प्रभागात पाणी, प्रदूषण, स्वच्छतागृहांची अपुरी संख्या व त्यांची दुरवस्था, अशा विविध समस्यांना येथील नागरिकांना  सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. हा प्रभाग झोपडपट्टीबहुल असून इमारतींचे प्रमाण कमी आहे. झोपडपट्टीधारकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचे हा प्रभाग जणू आगार बनला आहे.  सार्वजनिक स्वच्छतागृहांवर प्रभागातील नागरिकांना अवलंबून राहावे लागते. मात्र, मध्यरात्री १२ वाजता स्वच्छतागृहे बंद केली जात असल्याने नागरिकांची कुचंबणा होते. त्यामुळे अनेकांना रेल्वे रुळ परिसरात नैसर्गिक विधीसाठी जावे लागते. अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावत असून, तेथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 

प्रभाग क्रमांक : १४० 
विभागाचे नाव : एम पूर्व 
विधानसभा मतदारसंघ : शिवाजीनगर मानखुर्द 
लोकसभा मतदारसंघ : मुंबई उत्तर पूर्व 
प्रभागातील मतदार संख्या : ४७,१९०  

बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे, प्रदूषण
टँकरही वेळेवर येत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होतात. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याने डासांचा मोठा त्रास आहे. धूर फवारणी कमी प्रमाणात होत आहे. रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. पुरेशी व चांगली पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. बेकायदा बांधकामे, अतिक्रमण, वाहतूककोंडी आणि नाल्यांतील प्रदूषण यावर मार्ग काढण्याची गरज आहे. 

प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र
प्रमुख आस्थापना : देवनार पशुवधगृह 
रुग्णालये : आपला दवाखाना 
धार्मिक स्थळे : मंदिरे, मशिदी
शैक्षणिक संस्था : महापालिकेच्या शाळा 
प्रमुख विभाग :  टाटानगर, लुंबिनी बागेचा काही परिसर, गौतमनगर,  भीमवाडी विभाग 

आरोग्य सुविधांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. एकही मोठे रुग्णालय या परिसरात नाही. आपला दवाखाना कंटेनरमध्ये चालवला जात आहे. परिसरात नियमित नालेसफाई होत नाही. सफाई करणाऱ्यांचे कर्मचारी कागदावर जास्त व प्रत्यक्षात कमी कार्यरत असल्याने कामावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. रस्त्यांची काही कामे सुरू आहेत. ३२ सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. सहाय्यक आयुक्तांना आतापर्यंत ५ ते ६ वेळा भेटलो असून, त्यांच्याशी कामांबाबत चर्चा होते.
विजय उबाळे, नगरसेवक व एमआयएम गटनेता 

प्रशासनाचे या प्रभागाकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्य व्यवस्था अतिशय भीषण आहे. कोणतेही मोठे रुग्णालय येथे उपलब्ध नाही. शैक्षणिक सुविधांपासून आम्ही वंचित आहोत. इंटरनॅशनल शाळा उपलब्ध नाहीत. ही विदारक परिस्थिती बदलण्याची गरज आहे. देवनारमध्ये पशुंसाठी असलेल्या दहनवाहिनीच्या धुराचा नागरिकांना त्रास होतो. रुग्णांना शताब्दी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. कचरा व्यवस्थेसाठी पुरेशा कचराकुंडी तसेच कचरा गाड्यांच्या नियमित फेऱ्या सुरू करणे अत्यावश्यक आहे.
बबन ठोके, रहिवासी, गोवंडी  

रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना मोठा त्रास होतो. देवनार पशुवधगृह जवळच असल्याने नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. स्टेशनपासून केना मार्केट परिसरात दुर्गंधीचे जणू साम्राज्य पसरले आहे. नियमित साफसफाई होणे गरजेचे आहे. अन्यथा आजार पसरण्याची भीती आहे. शेअर रिक्षावाले कशाही रिक्षा चालवतात व पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करतात. नागरिकांनी बदल घडवला आहे, आता त्याचे प्रत्यंतर येणे गरजेचे आहे. 
अरबाज शेख, रहिवासी, गोवंडी

प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे. देवनार पशुवधगृहाचा कारभार तेथील महाव्यवस्थापकांच्या अखत्यारित आहे. पाणीपुरवठा सुरळीत व योग्य दाबाने व्हावा, यासाठी प्रशासन तत्पर आहे. आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्वच्छतागृहांबाबत सर्वेक्षण करून निर्णय घेतला जात आहे. लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन 
यांच्या समन्वयाने पुरेशा सुविधा मिळतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उज्ज्वल इंगोले, सहायक आयुक्त, एम पूर्व प्रभाग 

प्रभागातील समस्या -
पाणीटंचाई : अस्वच्छ व अपुरा, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. 
स्वच्छतागृहे : कमी संख्या व दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मध्यरात्री १२ वाजता बंद होत असल्याने महिलांची गैरसोय होते. 
अस्वच्छता : सफाईचे काम नियमितपणे होत नसल्याने सर्वत्र कचऱ्यांचे ढीग आहेत.
नाले तुंबलेले : नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याने नाही. परिणामी कचरा, गाळाने ते तुंबलेले असून, त्यामुळे होणारी दुर्गंधी व डास याचा फटका नागरिकांना बसतो. ते आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. मंजूर क्षमतेपेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असल्याने स्वच्छता योग्यपणे होत नाही. 
पार्किंग : वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मिळेल तिथे वाहने उभी केली जातात. 

Web Title : गोवंडी पानी की कमी और बुनियादी सुविधाओं से जूझ रहा है।

Web Summary : देवनार बूचड़खाने सहित गोवंडी का वार्ड 140 बुनियादी सुविधाओं से वंचित है। निवासियों को पानी की कमी, खराब स्वच्छता और अपर्याप्त सार्वजनिक शौचालयों का सामना करना पड़ता है। अवैध निर्माण और प्रदूषण समस्याओं को बढ़ाते हैं, अधिकारियों से जीवन स्थितियों को सुधारने के लिए तत्काल कार्रवाई की मांग करते हैं।

Web Title : Gowandi grapples with water scarcity and lack of basic amenities.

Web Summary : Gowandi's Ward 140, including Deonar abattoir, lacks basic amenities. Residents face water scarcity, poor sanitation, and inadequate public toilets. Illegal constructions and pollution exacerbate the problems, demanding urgent action from authorities to improve living conditions.