Instructions to set up new committees once school starts | शाळा सुरु झाल्यावर नवीन समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश

शाळा सुरु झाल्यावर नवीन समित्यांची स्थापना करण्याचे निर्देश


मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत राज्यातील शाळा बंद आहेत, मात्र शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरु व्हायला हवे अशी सरकारची भूमिका असल्याने ऑनलाईन पद्धतीने येत्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात येणार आहे.  या  पार्श्वभूमीवर राज्याच्या ज्या शाळांतील पालक शिक्षक संघ आणि कार्यकारी समित्या यांची मुदत संपत असेल त्यांना शाळा प्रत्यक्षात सुरु होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून हा निर्णय जारी करण्यात आला असून सध्यस्थितीत नवीन पालक शिक्षक संघ व कार्यकारी समित्यांची स्थापना करणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शाळांतील कामे विना अडथळे होत राहतील आणि ऑनलाईन शिक्षणाच्या नियोजनास ही मदत होणार आहे.

आरटीईच्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक शालेमध्ये पालक शिक्षक संघ आणि कार्यकारी समितीची स्थापना आवश्यक आहे. विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमधील समस्या सोडविण्याचे मूळ काम पालक शिक्षक संघाकडे असून शुल्क नियमांची पालक शिक्षक संघाची परवानगी आवश्यक असते. पालकांच्या अनेक समस्या पालक शिक्षक संघामार्फत शिक्षक आणि शाळांपर्यंत पोचविल्या जात असतात. त्यामुळे शाळा आणि पालक यांमधील समन्वय आणि नियोजनाचे महत्त्वाचे काम पालक शिक्षक संघ आणि कार्यकारी समितीवर असते. नवीन शैक्षणिक वर्षांत अस्तित्त्वात असलेल्या पालक शिक्षक संघ व कार्यकारी समितीची मुदत संपल्यानंतर नवीन संघाची स्थापना होणे अपेक्षित असते. मात्र यंदा कोरोनाला डब्ल्यूएचओ कडून जागतिक महामारी घोषित केल्यानंतर , राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता ऑनलाईन पद्धतीने शाळांचे वर्ग सुरु करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे.

शाळांच्या ऑनलाईन वर्ग नियोजनासाठी ही पालक शिक्षक संघ आणि त्यांच्याकडून होणाऱ्या नियोजनाची आवश्यकता असणार आहे. यामुळे यंदा नवीन पालक शिक्षक संघाची स्थापना करता येणार नसल्याने आधीच्याच संघाला व कार्यकारी समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. या सूचना लवकरच सर्व शाळा व्यवस्थापनांना देऊन त्याप्रमाणे कार्यवाही करून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात येतील अशी महिती देण्यात आली आहे.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Instructions to set up new committees once school starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.