हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’चा प्रारंभ सेवाग्रामपासून, गांधी जयंतीदिनी सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 13:03 IST2022-09-20T13:03:05+5:302022-09-20T13:03:41+5:30
गांधी जयंतीला सुरू होणार अभियान

हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’चा प्रारंभ सेवाग्रामपासून, गांधी जयंतीदिनी सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकमेकांशी संवादाची सुरुवात करताना हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या अभियानाचा प्रारंभ २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून सेवाग्राम (वर्धा) येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी ही घोषणा केली.
राज्य सांस्कृतिक विभागाच्या वतीने वर्धा येथे आयोजित राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा, तसेच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचा आढावा मुनगंटीवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. आ. पंकज भोयर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वर्धेचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, आदी या बैठकीस उपस्थित होते.
सेवाग्राम येथे २ ऑक्टोबरला होणाऱ्या समारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नारायण राणे हे प्रमुख पाहुणे असतील. यानिमित्त विविध स्पर्धा, शिबिरे व सांस्कृतिक कार्यक्रमही होतील.