लाडक्या बहिणींना फुकट पैसे देण्यापेक्षा त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा द्या; मंगेशकर हॉस्पिटलवरून शालिनी ठाकरे संतापल्या

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 4, 2025 22:01 IST2025-04-04T22:00:34+5:302025-04-04T22:01:24+5:30

मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सरकारला सुनावले खडे बोल.

Instead of giving free money to our beloved sisters, give them better health facilities; Shalini Thackeray angry at Mangeshkar Hospital | लाडक्या बहिणींना फुकट पैसे देण्यापेक्षा त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा द्या; मंगेशकर हॉस्पिटलवरून शालिनी ठाकरे संतापल्या

लाडक्या बहिणींना फुकट पैसे देण्यापेक्षा त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा द्या; मंगेशकर हॉस्पिटलवरून शालिनी ठाकरे संतापल्या

- मनोहर कुंभेजकर

मुंबई-पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत सामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. १० लाख रुपये अनामत रक्कम भरू न शकल्यामुळे ईश्वरी भिसे या गर्भवती महिलेला दीनानाथ रुग्णालयाने दाखल करून देण्यास नकार दिला. योग्य वेळेत उपचार न मिळाल्यामुळे ईश्वरीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खासगी रुग्णालयांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

 लाडक्या बहिणींना फुकट पैसे देण्यापेक्षा त्यांना मूलभूत सुविधा का पुरवत नाही असा संतप्त सवाल मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत सरकारला विचारला आहे.  "हॉस्पिटल दहा लाख मागतंय, सरकारच्या १५०० रुपयाचे काय करणार?असे खडे बोल त्यांनी सुनावले.

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा रुग्णालय प्रशासनाने १० लाख भरण्याची सक्ती केल्यामुळे मृत्यू झाला. एकीकडे सरकार महाराष्ट्रातील सर्व महिलांना लाडकी बहीण म्हणून १५०० रुपये देत असताना, त्याच बहिणीचा असा मृत्यू होणं महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं बाब आहे. लाडक्या बहिणीसारखी योजना आणून सरकारने त्यांना फुकट पैसे देण्यापेक्षा, तेच पैसे त्यांच्या सोईसुविधांसाठी खर्च केले असते, तर महाराष्ट्राला आज हा दिवस बघायची वेळ आली नसती असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

मुंबई-पुणे-नाशिक इथल्या केईएम, ससून, नायर सारख्या मोजक्याच सरकारी रुग्णालयांवर येणारा अतिरिक्त भार रुग्णालयांना न पेलवणारा झाला आहे. त्यामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयांसारख्या खासगी रुग्णालयांची मनमानी वाढत चालली असल्याची टिका त्यांनी केली.

आता तरी सरकारला जाग यावी आणि लाडक्या बहिणींना २१०० रुपयांची फुकट भेट देऊन राज्यावर ६३ हजार कोटींचं कर्ज वाढवण्यापेक्षा तेच पैसे, लाडक्या बहिणींच्या मानसिक, सामाजिक आणि आरोग्याच्या बळकटीसाठी करावे. कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून फुकट पैशांची नाही, चांगल्या सुखसुविधा आणि आरोग्य व्यवस्थेची गरज आहे. " दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने समिती नेमून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यात त्यांनी आपली भूमिका मांडली असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Instead of giving free money to our beloved sisters, give them better health facilities; Shalini Thackeray angry at Mangeshkar Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.