Deputy CM Ajit Pawar News: कोकणातून मुंबईत किंवा अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना साधारणपणे ‘चाकरमानी’ म्हटले जाते. परंतु, आता यानंतर ‘चाकरमानी’ असे न म्हणता, ‘कोकणवासीय’ असे संबोधावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. याबाबतचा शासनाचे परिपत्रक लवकरच येणार असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षानुवर्षे कोकणवासीयांना चाकरमानी असे संबोधले जात होते. परंतु, अवमानकारक असे संबोधन सरकारी कामकाजातून हटवावे, अशी सूचना अजित पवार यांनी केली. यासंदर्भात लवकरात लवकर परिपत्रक काढावे, असे निर्देशही दिले. नुकतीच मुंबई–गोवा महामार्गाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत कोकणवासीयांच्या काही संघटनांनी ‘चाकरमानी’ हा शब्द अपमानकारक वाटत असल्याने सरकारी कागदपत्रे आणि शासकीय कामकाजात त्याऐवजी कोकणवासीय हा शब्द वापरण्याची आग्रही मागणी केली. यानंतर अजित पवार यांनी याची दखल घेत संबंधित विभागाला स्पष्ट निर्देश दिले.
गणेशोत्सवापूर्वीच याबाबतचे शासन परिपत्रक
लवकरच शक्य झाले तर गणेशोत्सवापूर्वीच याबाबतचे शासन परिपत्रक काढले जाणार आहे. अनेक दशकांपासून कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील नागरिक कामाच्या, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे ‘चाकरमानी’ हा मराठी शब्द प्रामुख्याने कोकणातून शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या नागरिकांसाठी रूढ झाला.
चाकरमानी म्हणजे नेमके काय?
‘चाकरमानी’ हा मराठी शब्द प्रामुख्याने कोकणातून मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या व्यक्तींसाठी वापरला जातो. या नागरिकांनी कोकणाशी असलेली कौंटुंबिक नाळ जोडून ठेवली आहे. विशेष करून शिमगा, गणेशोत्सव, दिवाळी किंवा इतर सणांसाठी हे लोक मोठ्या संख्यने आपल्या गावी परतत असतात. गावाकडे त्यांचा उल्लेख ‘चाकरमानी’ असा केला जातो. चाकरमानी हा शब्द मराठीतून आला असून, चाकर (सेवक) आणि मानी (मानणारा) यांच्या संयोगातून तयार झाला आहे.
दरम्यान, यालाच कोकणवासियांच्या काही संघटनांनी आक्षेप घेतला. कोकणवासीयांच्या काही संघटनांना हा शब्द कमीपणाचा वाटत असल्याने त्यांनी ‘चाकरमानी’ या शब्दावर हरकत घेतली आहे. त्यांच्या मते, हा शब्द कोकणवासीयांच्या मेहनतीला आणि स्वाभिमानाला कमी लेखणारा आहे. त्यामुळे या संघटनांच्या मागणीनुसार महायुती सरकार कडून ‘चाकरमानी’ शब्दाऐवजी कोकणवासीयांच्या सांस्कृतिक ओळखीला सन्मान देण्यासाठी ‘कोकणवासी’ हा शब्द वापरण्यात येणार आहे.