Instead of cheaper to watch TV became expensive, Triad complained of flooding | टीव्ही पाहणे स्वस्त होण्याऐवजी झाले महाग, ट्रायकडे तक्रारींचा महापूर

टीव्ही पाहणे स्वस्त होण्याऐवजी झाले महाग, ट्रायकडे तक्रारींचा महापूर

मुंबई : ट्रायने जानेवारी महिन्यापासून लागू केलेल्या नवीन नियमावलीअंतर्गत टीव्ही पाहणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वाहिन्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. त्यामुळे ग्राहकांचे बिल कमी होईल, असा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात नवीन नियमावलीमुळे टीव्ही पाहणे पूर्वीपेक्षा अधिक महाग झाल्याच्या तक्रारी ट्रायकडे करण्यात आल्या.

वाहिन्यांची निवड करण्याची प्रक्रियादेखील जटिल व क्लिष्ट असून पाहिजे तेव्हा पाहिजे ती वाहिनी निवडणे व पाहणे सहजशक्य होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात ट्रायकडे आल्या आहेत. त्यामुळे या नियमावलीचा दूरसंचार नियामक आयोगाकडून (ट्राय) पुनर्विचार केला जाणार आहे.

टीव्ही पाहणे पूर्वीपेक्षा अधिक खर्चीक झाल्याने व वाहिन्यांची निवड करताना येणाºया अडचणींबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत दूरसंचार नियामक आयोग (ट्राय) ने आपल्या ८ महिन्यांपूर्वीच्या नवीन नियमावलीचा पुनर्विचार करण्यास प्रारंभ केला आहे. ब्रॉडकास्टर्सकडून ग्राहकांना अधिक किमतीत वाहिन्या दाखवल्या जात असल्याने व त्यांचा वाहिन्यांची निवड करण्याचा हक्क हिरावून घेतला जात असल्याने ब्रॉडकास्टर्सवर आक्षेप घेतले आहेत.

ट्रायने कन्सल्टेशन पेपर सादर करून ३० प्रश्न उपस्थित केले आहेत. बुकेमध्ये वाहिन्यांची कमाल किंमत मर्यादा १९ रुपये आहे त्याचा पुनर्विचार व्हावा का, वाहिन्यांच्या बुकेला परवानगी द्यावी का, बुके स्वीकारल्यास ग्राहकांना दिल्या जाणाºया सवलतीचा पुनर्विचार व्हावा का अशा प्रकारचे ३० प्रश्न उपस्थित केले आहेत.

ग्राहकांना वाहिन्यांचा समूह स्वीकारताना तब्बल ७० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे, मात्र स्वतंत्रपणे वाहिन्यांची निवड केल्यास मात्र त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना पडत आहे. त्यामुळे ब्रॉडकास्टर्सच्या निवडीप्रमाणे वाहिन्या पाहणे ग्राहकांना भाग पडत आहे. त्यामुळे रेग्युलेटरनी वाहिन्यांचा समूह देताना त्याच्या सवलतीवर मर्यादा असावी अशी भूमिका दूरसंचार नियामक आयोग (ट्राय) ने मांडली आहे.

स्वतंत्र वाहिन्यांची निवड केल्यास जेवढी रक्कम भरावी लागते त्यापेक्षा ब्रॉडकास्टर्सनी दिलेल्या समूह वाहिन्यांची निवड केल्यास तब्बल ७० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने ट्रायने याला आक्षेप नोंदवला आहे. जे ग्राहक समूह वाहिन्यांऐवजी स्वतंत्र वाहिन्या निवडतात त्यांना जास्त पैसे द्यावे लागत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भूमिका ट्रायने मांडली आहे.

ब्रॉडकास्टर्स अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म आॅपरेटर्सना (डीपीओ) वाहिन्यांचे दर ठरवण्याचा अधिकार देण्यात आला, मात्र त्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी ट्रायकडे करण्यात आल्या आहेत. यावर ग्राहकांना १६ सप्टेंबरपर्यंत हरकती, सूचना नोंदवता येतील व त्यावर ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे ट्रायकडून सांगण्यात आले.

ब्रॉडकास्टर्सच्या आर्थिक लाभासाठी वाहिन्यांचा समूह
- ग्राहकांच्या मागणीप्रमाणे समूह वाहिन्या तयार करण्याऐवजी ब्रॉडकास्टर्स त्यांना जास्त आर्थिक लाभ होईल अशा प्रकारे वाहिन्यांचा समूह तयार करत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये नेमकी कोणती वाहिनी पाहावी याबाबत गोंधळ निर्माण होत आहे व ज्या वाहिन्यांना प्रत्यक्षात दर्शक पसंत करत नाहीत त्यांना समूह वाहिन्यांमुळे टीआरपी मिळत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे.

ट्रायच्या नियमावलीतील चुकीच्या बाबींवर आम्ही सातत्याने आवाज उठवला होता. पुनर्विचार योजनेमुळे आमचे आक्षेप योग्य असल्यावर ट्रायने शिक्कामोर्तब केले आहे. ब्रॉडकास्टर्स व मल्टी सर्व्हिस आॅपरेटर यांच्यामध्ये डिस्काउंटचा खेळ खेळला जात असून ग्राहक व सामान्य केबल चालकांना त्याचा काहीही लाभ होत नाही. आम्ही याबाबत सविस्तर अभ्यास करून आमच्या हरकती व सूचना ट्रायसमोर लवकरच मांडू.
- राजू पाटील, केबल आॅपरेटर अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युटर असोसिएशन

Web Title: Instead of cheaper to watch TV became expensive, Triad complained of flooding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.