लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हिंदमाता, गांधी मार्केट या ठिकाणी आवश्यक पाणी उपसा यंत्रणा न उभारल्याने तसेच ती कार्यान्वित न केल्याने पहिल्याच मुसळधार पावसात या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे आता अधिक मनुष्यबळ नेमून येथील पाणी उपसा यंत्रणा प्रभावी करावी, तिथे फ्लो मीटर बसवावेत आणि पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनरेटर तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभाग आणि रस्ते व वाहतूक विभागामार्फत मुंबईत विविध कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदमाता, गांधी मार्केट आणि पूर्व उपनगरांतील चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळील पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांची तसेच रस्ते कामांची आयुक्त गगराणी यांनी पाहणी केली.
चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळील नाल्यांची व्यवस्थित स्वच्छता करून पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्याच्या सूचनाही गगराणी यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर परळ येथील एफ दक्षिण विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रास भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
उपसा संचांचा आढावा- हिंदमाता आणि सायनच्या गांधी मार्केट येथील जल साठवण टाकी, उपसा संच, मुख्य जलवाहिनी आणि साठवण प्रक्रियेचा आढावाही त्यांनी घेतला. सायन येथील जैन सोसायटी मार्ग, दादर येथील परळचा राजा मार्ग या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांचीदेखील पाहणी केली.
हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही: पालिका
- हिंदमाता, गांधी मार्केट, यलो गेट आणि चुनाभट्टी येथील लघु उदंचन केंद्र परिचालकांनी अटी व शर्ती न पाळल्याचा आणि पुरेशा क्षमतेने व वेळेत यंत्रणा कार्यान्वित न केल्याचा ठपका ठेवत पालिका प्रशासनाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
- भविष्यात नेमून दिलेल्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, त्रुटी खपवून घेतली जाणार नाही. तसे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.