"फडणवीसांची 'ती' वकिली पाहून हेडगेवार, गोळवलकर गुरुजींचा जीव तीळ तीळ तुटला असेल!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 10:42 IST2022-04-07T10:38:28+5:302022-04-07T10:42:02+5:30

किरीट सोमय्यांचा बचाव करणाऱ्या फडणवीसांचा शिवसेना खासदार संजय राऊतांकडून समाचार

ins vikrant case shiv sena mp sanjay raut slams bjp devendra fadnavis for defending kirit somaiya | "फडणवीसांची 'ती' वकिली पाहून हेडगेवार, गोळवलकर गुरुजींचा जीव तीळ तीळ तुटला असेल!"

"फडणवीसांची 'ती' वकिली पाहून हेडगेवार, गोळवलकर गुरुजींचा जीव तीळ तीळ तुटला असेल!"

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आयएनएस विक्रांत निधी प्रकरणावरून आक्रमक झाले आहेत. विक्रांतसाठी गोळा केलेला निधी स्वत:च्या खिशात घालणाऱ्या किरीट सोमय्यांची वकिली देवेंद्र फडणवीस कसे काय करू शकतात, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. देशभक्तीवर भाषणं देणाऱ्या फडणवीसांनी खरं तर सोमय्यांना चार जोडे मारायला हवे होते. मात्र स्वत:ला अभ्यासू म्हणवणारे फडणवीस सोमय्यांची वकिली करतात ते पाहून वाईट वाटतं, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीसांवर घणाघात केला.

आयएनएस विक्रांत देशवासीयांसाठी अभिमानाचा विषय आहे. त्या युद्धनौकेनं पाकिस्तानचे दोन तुकडे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या युद्धनौकेच्या नावाखाली सोमय्यांनी पैसे गोळा केले. ते पैसे त्यांनी स्वत:च्या खिशात घातले. सैनिकांच्या बलिदानाचा बाजार मांडला. भाजप नेते अशा देशद्रोह्याचं समर्थन कसं काय करू शकतात, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

सोमय्यांच्या समर्थनार्थ फडणवीसांनी वकिली केली. त्याचं मला आश्चर्य वाटतं. फडणवीसांची वकिली पाहून स्वर्गवासी झालेल्या हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, देवरस, शामाप्रसाद मुखर्जींचा जीव तीळ तीळ तुटला असेल. देशाच्या स्वाभिमानाचा लिलाव करून पैसे गोळा करणाऱ्या माणसाची वकिली करणाऱ्या फडणवीसांचं आश्चर्य वाटतं, असं राऊत म्हणाले.

तुमच्याच राजभवनानं सोमय्यांनी केलेल्या अपहाराचा पुरावा दिला आहे. तुम्हाला अजून कोणते पुरावे हवेत, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. जवानांच्या बलिदानाचा लिलाव करणाऱ्यांना अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. सोमय्यांनी सेव्ह विक्रांत नावानं गोळा केलेल्या निधीचं पीएमसी बँकेच्या माध्यमातून मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा आरोपही त्यांनी केला. 

Web Title: ins vikrant case shiv sena mp sanjay raut slams bjp devendra fadnavis for defending kirit somaiya