Join us

मराठी कुटुंबावर अन्याय, ठाकरे गटानं फोडली वाचा; शिंदेसेनेने विभागप्रमुखाची केली हकालपट्टी

By प्रविण मरगळे | Updated: March 10, 2025 12:29 IST

उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जेव्हा ही घटना समजली त्यानंतर त्यांनी स्वत: पोलिसांना आदेश देत या प्रकरणावर आवश्यक कारवाई करा असं सांगितले अशी माहिती शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली.

मुंबई - शहरातील कांदिवली चारकोप भागात एका मराठी कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप शिंदेसेनेचे विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित यांच्यावर लागला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी ही घटना उघडकीस आणल्यानंतर आता शिंदेसेनेतून विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित यांची हकालपट्टी केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत. 

या घटनेबाबत अखिल चित्रे यांनी म्हटलं की, शिंदेसेनेचे विभागप्रमुख आणि रामदास कदमांचा निकटवर्तीय लालसिंग राजपुरोहित याने कांदिवलीतील एका मराठी कुटुंबाची जागा हडपली. या कुटुंबाला सत्तेचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि हडप केलेल्या जागेवर शिंदेसेनेची शाखा उभी केली. ते मराठी कुटुंब प्रचंड दहशतीखाली जगत होतं. या कुटुंबाने आदित्य ठाकरे यांच्याकडे त्यांची कैफियत मांडली त्यानंतर आदित्य ठाकरेंनी तात्काळ पाऊले उचलल्याने २४ तासांत लालसिंग राजपुरोहित याच्यावर गुन्हा दाखल झाला असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय मराठी कुटुंबाला छळणाऱ्या लालसिंग राजपुरोहित ह्या गुंडाला पक्षातून निलंबित केलंय खरं पण त्याला गुन्ह्यांमधून वाचवायला शिंदेसेनेच्या बड्या नेत्यांची मुलं आपलं वजन वापरत आहेत की काय असा संशय निर्माण होत आहे. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कुणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता अशा गुंडांचा बंदोबस्त करावा नाहीतर असे विकृत गुंड सोबतीला घेऊन राजकारण करायचा पायंडा पडेल. त्यांच्याबरोबरच्या लोकांवर मुंबई पोलीसात ३०-३० गुन्हे नोंद आहेत असा आरोप उद्धवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी केला.

या प्रकरणावर शिंदेसेनेची भूमिका काय? दरम्यान, मराठी कुटुंबावर अन्याय केल्याचा आरोप समोर येताच विभागप्रमुख लालसिंग राजपुरोहित यांना तात्काळ त्यांच्या पदावरून आणि पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जेव्हा ही घटना समजली त्यानंतर त्यांनी स्वत: पोलिसांना आदेश देत या प्रकरणावर आवश्यक कारवाई करा असं सांगितले. ही शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आहे. कुणीही चुकीचे वागत असेल, कुणावरही अन्याय करत असेल मग जरी तो आमचा पदाधिकारी असला तरीही त्याला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही असा संदेश शिंदेंनी त्यांच्या कृतीतून दिल्याचं शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेनाआदित्य ठाकरे