Join us

Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 23:58 IST

Ratan Tata Passed Away: शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ratan Tata Death ( Marathi News ) : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष पद्मविभूषण रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे आज रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रतन टाटा हे ७ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. त्यासंदर्भात त्यांनीच सोशल मीडियावरून माहिती दिली होती. मात्र मागील काही तासांत त्यांची प्रकृती खालावत गेली आणि बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.

रतन टाटा यांचा जीवनप्रवास

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. रतन टाटा यांना १९९१ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. चेअरमन झाल्यानंतर त्यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले. त्यांनी २०१२ पर्यंत टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. १९९६ मध्ये टाटांनी दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली आणि २००४ मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) बाजारात 'लिस्टेड' झाली. चेअरमन पदावरून पायउतार झाल्यानंतर टाटा यांना टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, टाटा स्टील आणि टाटा केमिकल्सचे मानद अध्यक्षपद बहाल करण्यात आले होते.

टॅग्स :रतन टाटाटाटा