Join us  

'इंदिरा गांधींनीच करीम लाला अन् हाजी मस्तानला तुरुंगात डांबले'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 4:25 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊतांच्या करीम लाला आणि

मुंबई - देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांची भेट झाली होती, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला असून भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर, राऊत यांनी मी माझे विधान मागे घेतले, पण रेकॉर्डवरील कसे मागे घेणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे.  

भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, संजय राऊतांना बाळासाहेब थोरातांचा इशारा 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊतांच्या करीम लाला आणि इंदिरा गांधींच्या भेटीच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचे होते. त्यावर आमची नाराजी होती. आम्ही याबाबत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कळवले आहे. आता, संजय राऊत यांनी हे वक्तव्य मागे घेतले आहे. मात्र, भविष्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही. या गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. त्यानंतर, राऊत यांनी पुन्हा विधान मागे घेतले पण रेकॉर्डवरील नोंद कशी मागे घेणार? असे म्हटले आहे. 

राऊतांच्या वक्तव्यांनी आघाडीत बिघाडी; काँग्रेससह राष्ट्रवादीतही नाराजी

इंदिरा गांधी - करीम लाला भेटीबद्दल संजय राऊत बोलले ते खरं आहे का?; फडणवीसांचे काँग्रेसला पाच प्रश्न

इंदिरा गांधी या देशातील सर्वात शक्तिशाली नेता होत्या. त्यांच्यासारखा नेता कधी झाला नाही आणि होणारही नाही, असे म्हणत दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कार्याचं कौतुक केलं आहे. तसेच, खान अब्दुल गफार खान आणि करीम लाला हे पठाण समुदायाचे नेते होते. त्यामुळे देशातील पठाण समुदायाचे प्रश्न मांडण्यासाठी ते नेतृत्वाकडे जात असतं. तसेच, ते इंदिरा गांधींकडे गेले होते, त्यातून इंदिरा गांधी आणि करीम लाला यांची भेट झाली होती. मात्र, त्याच इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात करीम लाला आणि हाजी मस्तान यांना तुरुंगात टाकले होते. आंतरराष्ट्रीय दबाव असतानाही या दोघांना इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकले होते, असेही राऊत यांनी आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 

इंदिरा गांधी आणि करीम लालाच्या भेटीबाबतचे विधान संजय राऊत यांच्याकडून मागे 

दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीबाबत केलेले विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी अखेर मागे घेतले आहे. मी केलेल्या वक्तव्यामुळे कुणी दुखावले असेल तर हे विधान मी मागे घेत आहे, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. बुधवारी पुण्यात 'लोकमत'च्या वतीने आयोजित 'लोकमत पत्रकारिता पुरस्कार' सोहळ्यात संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा होता. त्यावेळी मोठ-मोठ्या नियुक्त्यासुद्धा या अंडरवर्ल्डच्या सल्ल्याने होत होत्या. तसेच, त्याकाळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 

टॅग्स :संजय राऊतइंदिरा गांधीकाँग्रेसगुन्हेगारी जगतमुंबई