इंडिगो खरेदी करणार ३० आलिशान विमाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 10:41 IST2025-10-19T10:41:17+5:302025-10-19T10:41:17+5:30
विशेष म्हणजे त्यांचे इंजिन हे रोल्स रॉईस या प्रख्यात कंपनीचे असणार आहे.

इंडिगो खरेदी करणार ३० आलिशान विमाने
मुंबई : देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीने ताफ्यात आणखी ३० नवीन ए-३५० ही आलिशान विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे त्यांचे इंजिन हे रोल्स रॉईस या प्रख्यात कंपनीचे असणार आहे.
एअरबस कंपनीची ए-३५० या प्रकारातील विमाने अतिशय प्रशस्तही असतात. यापूर्वी कंपनीने या प्रकारच्या ३० विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. या नव्या ऑर्डरमुळे कंपनीच्या ताफ्यात आता ए-३५० जातीची ६० विमाने होणार आहेत. देशाच्या विमान क्षेत्रात ६० टक्क्यांपेक्षा अधिक मार्केट हिस्सेदारी असलेल्या इंडिगोच्या ताफ्यात सध्या ४०० विमाने आहेत. तर, कंपनीने यापूर्वी विविध प्रकारच्या ९०० विमानांची ऑर्डर देखील दिली आहे.
विमानतळ कामगारांना ३५ हजार रुपयांचा बोनस
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील कामगारांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे. या कामगारांना दिवाळीसाठी ३५ हजार रुपयांचा बोनस मिळाला.
लोडर, ड्रायव्हर, क्लिनर या कामगारांसाठी ३५ हजार रुपये व व्हाईट कॉलर कामगारांना एक बेसिक वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
विमानतळावरील सेवा पुरवठादार कंपनीच्या व्यवस्थापनासोबत दिवाळीच्या बोनस संदर्भात भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्यासोबत बैठक झाली होती. संजय कदम, सुजित कारेकर आणि भारतीय कामगार सेनेचे आभार मानले. चिटणीस संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, सहचिटणीस सुजित कारेकर आदी उपस्थित होते.