इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 05:51 IST2025-12-13T05:49:54+5:302025-12-13T05:51:22+5:30
देशातील अन्य शहरांप्रमाणेच राज्यातील नागपूर या उपराजधानीतून मुंबईकरिता उड्डाण करणाऱ्या विमान सेवेला देखील याचा फटका बसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
मुंबई : एकीकडे आपली विमान सेवा पूर्ववत होत असल्याचा दावा इंडिगो कंपनी करत असली तरी मुंबई विमानतळावर उशीराने दाखल होणाऱ्या इंडिगो विमान सेवेचा फटका अन्य विमान कंपन्यांना बसत असून अन्य विमान कंपन्यांच्या विमान सेवेला देखील विलंब होत आहे.
देशातील अन्य शहरांप्रमाणेच राज्यातील नागपूर या उपराजधानीतून मुंबईकरिता उड्डाण करणाऱ्या विमान सेवेला देखील याचा फटका बसल्याची माहिती सुत्रांनी दिली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया कंपनीचे नागपूर ते मुंबई हे विमान रात्री १०.१० वाजता नियोजित होते. मात्र, ते रात्री ११.१५ नंतर निघाले. ते गोव्याहून मुंबईत आणि मुंबईतून नागपूरला उशिरा आले. इंडिगो च्या गोंधळाचा फटका देशातल्या सगळ्यात विमानतळांना बसत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्या कारणांमुळे विलंब होत आहे, याचे कारण प्रवाशांना दिले नाही.
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
नागपूर विमानतळावरून दिल्ली, बेंगलोर, पुणे येथे जाणाऱ्या विमानाचे प्रवासीही नागपूरला अडकून पडले. अधिवेशनामुळे नागपूरहून काही व्हीआयपी विमानांना प्राधान्याने पाठवले गेले म्हणून प्रवासी विमानांना उशीर झाल्याची चर्चा होती. त्यावर कोणीही खुलासा करत नव्हते.
इतर कंपन्यांच्या विमानाने जाणाऱ्या प्रवाशांचाही खाेळंबा
हवाई वाहतूक क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरून रात्री सर्वाधिक उड्डाणे ही परदेशासाठी होतात. त्यामुळे त्यांना प्राधान्य द्यावे लागते. त्यातच मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या समांतर नाहीत.
त्यामुळे एकावेळी एकच धावपट्टी उड्डाण किंवा विमान उतरण्यासाठी उपलब्ध असते. त्यात इंडिगो कंपनीचा घोळ सुरू असल्यामुळे त्यांची विमाने देखील विलंबाने मुंबईत उतरत आहेत. त्यांना धावपट्टी उपलब्ध करून द्यावी लागत आहे.
याचा परिणाम अन्य शहरांतून मुंबई विमानतळावरील परिस्थितीचा अंदाज घेत विमान कंपन्या आपल्या उड्डाणांचे नियोजन करत आहेत. मात्र, हे नियोजन काेलमडले असून याचा फटका प्रवाशांना विलंबाच्या रुपाने भोगावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.