Join us

रशियासाठी मानवी तस्करीत भारतीय विद्यार्थीही होते रडारवर; बनावट युनिव्हर्सिटीच्या नावानेही फसवणूक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:09 IST

धक्कादायक म्हणजे या टोळीने भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करत त्यांना प्रवेश मिळवून देतो सांगत बनावट युनिव्हर्सिटीच्या नावाखाली फसवणूक केली आहे.

मुंबई : सीबीआयने मानवी तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करत चांगल्या पगाराच्या नोकरीच्या नावाखाली थेट रशिया-युक्रेन युद्धभूमीवर पाठवणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. धक्कादायक म्हणजे या टोळीने भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करत त्यांना प्रवेश मिळवून देतो सांगत बनावट युनिव्हर्सिटीच्या नावाखाली फसवणूक केली आहे.

सीबीआयने मुंबईसह, ठाणे, पालघर, तामिळनाडू, चेन्नई, दिल्लीसह, रशियातील एजंट, टूर्स ट्रॅव्हल कंपनीचे संचालक अशा एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या टोळीने आतापर्यंत परदेशात पाठवलेल्या पीडितांच्या जवळपास ३५ घटना समोर आल्या आहेत. यामध्ये मुंबईतील मालाडच्या ओएसडी टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल आणि व्हिसा सर्व्हिसेसचा संचालक राकेश पांडेचाही समावेश आहे. संशयास्पद रिक्रुटमेंट एजन्सी आणि एजंट्सकडून दिल्या जाणाऱ्या नोकऱ्यांच्या अशा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन सीबीआयकडून करण्यात आले आहे. 

भारतीय नागरिकांना यू ट्यूब तसेच अन्य सोशल मीडियाद्वारे त्यांच्या स्थानिक संपर्क/एजंटद्वारे रशियामध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखविले जायचे. त्यानंतर, तस्करी झालेल्या भारतीय नागरिकांना प्रशिक्षण देत त्यांना जबरदस्तीने रशिया-युक्रेन युद्ध क्षेत्रामध्ये तैनात करत असल्याचा धक्कादायक प्रकार कारवाईतून समोर आला आहे. युद्धक्षेत्रात काही  जण गंभीर जखमी झाल्याचेही आढळून आले आहे. हे रॅकेट रशियामध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीसह चांगले आयुष्य, शिक्षणासह विविध गोष्टींचे आमिष दाखवत त्यांच्याकडून अवैधपणे पैसेही उकळत होते.

  कागदपत्रांच्या आधारे आरोपींचा शोध-     भारतीय विद्यार्थ्यांनाही या टोळीने टार्गेट केले होते. रशियात सरकारकडून मोफत शिक्षण संस्था असताना, विद्यार्थ्यांना खासगी शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळत होते. -     मात्र या शिक्षण संस्था देखील बनावट असल्याचे समोर आले आहे. टोळीच्या जाळ्यात अडकून रशियाला पोहोचताच तेथील एजंट त्यांचे पासपोर्ट काढून घेत होते. त्यांना सैन्यदलाचे प्रशिक्षण देत युद्धासाठी तैनात करत होते. -     या रॅकेटच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो जणांची अशा प्रकारे मानवी तस्करी केल्याचा संशय असून सीबीआयकडून झाडाझडती सुरू आहे. जप्त कागदपत्रांच्या आधारे यातील आरोपींचा शोध सुरू आहे.

टॅग्स :युक्रेन आणि रशियायुद्धविद्यार्थी