Join us  

चीनमध्ये 45 हजार तर भारतात 1.50 लाख अपघात, रस्ते सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 8:09 PM

भारतातील अपघातांचे प्रमाण हे चीनपेक्षाही जास्त आहे. सन 2005 साली चीनचे अपघाताचे प्रमाण

मुंबई - जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमधील अपघाताचे प्रमाण भारतापेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे, गेल्या 15 वर्षात हे प्रमाण कमी करण्यात चीनला मोठं यश आलं आहे. तर, तुलनेनं भारतामध्ये अपघाताचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्ते अपघातापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. याबाबत, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी आवाहन केले आहे.   

भारतातील अपघातांचे प्रमाण हे चीनपेक्षाही जास्त आहे. सन 2005 साली चीनचे अपघाताचे प्रमाण 94 हजार आणि भारताचे 98 हजार होते. सध्या चीनमधील अपघातांचे प्रमाण 45 हजारांवर आहे. तर भारताचे 1.50 लाखांवर आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी ‘आपली सुरक्षा ही कुटुंबांची सुरक्षा’ समजून शून्य टक्के अपघाताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवावा, असे आवाहन मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी केले आहे. 

राज्यात वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान एक आठवडा न पाळता वर्षभर वाहतुकीच्या नियमांसाठी दक्ष राहून शून्य टक्के अपघाताकडे लक्ष देऊन सुरक्षित महाराष्ट्र घडवूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.  जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य व मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 वा राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 चे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवहनमंत्री ॲड.अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य राहुल नार्वेकर उपस्थित होते.

पोलीस यंत्रणा नेहमीच आपल्या युनिफॉर्ममध्ये कर्तव्य बजावत असतात. म्हणून सामान्य जनता विविध उत्सव-सणांचा आनंद घेऊ शकते. या आनंदाची खरी मानकरी ही पोलीस यंत्रणाच आहे. वाहतुकीचे नियम शाळा, महाविद्यालय स्तरावर मुलांना शिकवणे आवश्यक आहे. मुलांना नियम समजल्यानंतर ते आपल्या कुटुंबियांना समजावून सांगतात. त्यासाठी मुलांना सुरक्षिततेचे नियम सांगणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर वाहतूक पोलीस जरी दिसत नसले तरी पोलिसांचे लक्ष आपल्यावर असते. वाहन चालविताना नेहमी नियमांचे पालन करावे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

 

टॅग्स :अपघातउद्धव ठाकरेशिवसेनामुख्यमंत्री