गोळ्या घेऊन वजन कमी करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 06:26 IST2026-04-02T06:25:15+5:302026-04-02T06:26:58+5:30
वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात, सावधान!; अनधिकृत विक्री, अप्रत्यक्ष प्रचारावर बंदी

गोळ्या घेऊन वजन कमी करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे
मुंबई : वजन कमी करण्याच्या मोहापायी त्यासाठीची औषधे, गोळ्या यांचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. मात्र, वैद्यकीय देखरेख आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेतल्यास त्यांचे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशाराच तज्ज्ञांनी दिला आहे. हे लक्षात घेऊन आता देशातील औषध नियंत्रकांनी अशाप्रकारच्या औषधांची अनधिकृत विक्री आणि जाहिरात या विरोधातील नियामक देखरेख अधिक तीव्र केली असून, त्यांच्या अप्रत्यक्ष प्रचारावर बंदी घातली आहे.
बाजारपेठेत जीएलपी १ आधारित वजन कमी करण्याच्या औषधांचे अनेक जेनेरिक प्रकार दाखल झाल्याने किरकोळ औषध दुकाने, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, घाऊक विक्रेते व व्यावसायिक (वेलनेस क्लिनिक्स) यंत्रणांमार्फत याचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे वजन कमी करण्याच्या औषधांच्या ऑफ-लेबल वापराला प्रोत्साहन देऊ शकणाऱ्या जाहिराती किंवा कोणत्याही प्रकारच्या अप्रत्यक्ष प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. १० मार्च रोजी याबाबत केंद्राकडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
काही अटींवर औषधे देण्यास मान्यता
देशात एंडोक्रायनोलॉजिस्ट, मेडिसिन तज्ज्ञ हृदयरोगतज्ज्ञांच्या औषधचिठ्ठीच्या आधारे ही औषधे देण्यास काही अटींवर मान्यता दिली आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये ही नियामक देखरेख अधिक तीव्र केली जाईल आणि नियमांचे पालन न केल्यास परवाने रद्द करणे, दंड आकारण्यासह खटला भरण्यासारखी कठोर पावले उचलली जातील.
जीएलपी-१ म्हणजे काय ?
जीएलपी-१ हा आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारा एक हार्मोन आहे. तो मुख्यतः आतड्यांमध्ये तयार होतो व जेवणानंतर सक्रिय होतो. त्याचे मुख्य कामः इन्सुलिन वाढवणे. ज्यामुळे रक्तातील साखर कमी होते व वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
भारतात जीएलपी-१ वजन कमी करणाऱ्या औषधांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी जारी केलेल्या नियमावलीचे स्वागतच आहे. या औषधांनी लठ्ठपणा व मधुमेहाच्या उपचारांमध्ये लक्षणीय सुधारणा केली असली, तरी ही औषधे केवळ एंडोक्रायनोलॉजिस्ट, अंतर्गत वैद्यक तज्ज्ञ किंवा कार्डिओलॉजिस्ट यासारख्या पात्र तज्ज्ञांकडूनच दिली गेली जावीत. डॉ. शशांक जोशी, एंडोक्रायनोलॉजिस्ट, लिलावती रुग्णालय
ही औषधे घेताना ती तज्ज्ञांच्या देखरेखीखाली घेणे गरजेचे आहे. तसेच योग्य अशा पात्र रुग्णांनी ती औषधे घेणे गरजेचे आहे. कुणीही केवळ त्या गोळ्या सहज उपलब्ध आहेत म्हणून वजन कमी करण्यासाठी या गोळ्या घेणे चुकीचे आहे. डॉ. कल्याण मुंडे, हृदयरोग तज्ज्ञ, जे. जे. रुग्णालय
कोणते दुष्परिणाम
बद्धकोष्ठता, उलटी, स्वादुपिंडाचा त्रास, मळमळ, पोटात मुरडा किंवा दुखणे, जुलाब