Join us

महिला कर्मचाऱ्याशी विमानात अश्लील चाळे; मुंबई विमानतळावर बांग्लादेशी प्रवाशाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 06:56 IST

मस्कत येथून मुंबईकडे येत असताना पहाटे साडेचारच्या सुमारास दुलाल याने विमान कंपनीच्या २२ वर्षीय महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे केले

मुंबई : मस्कत येथून मुंबईकडे निघालेल्या विमानात एका बांगलादेशी प्रवाशाने महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद दुलाल (३०) असे या प्रवाशाचे नाव असून  त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुलाल मनोरुग्ण असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे.

विस्तारा कंपनीचे विमान ६ सप्टेंबर रोजी मस्कत येथून मुंबईकडे येत असताना पहाटे साडेचारच्या सुमारास दुलाल याने विमान कंपनीच्या २२ वर्षीय महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे केले. संबंधित महिला कर्मचाऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या लँडिंगला अर्धा तास उरलेला असताना ती या आरोपीच्या जागेवर ट्रे उचलण्यासाठी आली त्यावेळीच त्याने तिला इशारे केले. तिने दुलालच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले व पुढे गेली. मात्र, तेवढ्यात दुलालने तिला मागून मिठी मारत तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.

या प्रकाराने घाबरलेल्या महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांना हाक मारली. त्यांनी तसेच सोबतच्या काही प्रवाशांनी मध्ये पडत तिला सोडवण्याचा प्रयत्न केला. तरीही दुलालने महिला कर्मचाऱ्याचा हात पकडूनच ठेवला होता. मध्ये पडलेल्या लोकांनाही त्याने मारपीट करण्याचा प्रयत्न केला.विमान मुंबईत उतरल्यानंतर दुलालला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच, तो बांगलादेशचा नागरिक असल्याने बांगलादेश दूतावासाशी संपर्क साधत त्याच्या अटकेची माहिती देण्यात आली. विमान प्रवासातील गैरप्रकारांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ होत असून २०१७ पासून आतापर्यंत मुंबई विमानतळावर विनयभंगाच्या सुमारे २३ घटनांची नोंद झाली आहे.

टॅग्स :विमानपोलिस